मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला थेट इशारा !

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला थेट इशारा !

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये लोकसभा निवडणूकीचं रणशिंग फुंकलं आहे. भारतीय जनता पक्षाचं ‘अटल संकल्प महासंमेलन’ आज इथल्या मदनलाल धिंग्रा मैदानावर पार पडलं आहे. यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. मावळ आणि शिरुरमधून तेच खासदार निवडून जातील जे नरेंद्र मोंदींना पाठींबा देतील, ते देणार असतील तर आम्ही त्यांच्या सोबत जाणार अन्यथा साथ देणार नसतील तर आमचे उमेदवार तयार आहेत असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिला आहे. युती झाल्यास दोन्ही मतदारसंघ सेनेकडे, युती न झाल्यास स्वबळावर निवडून येण्याची आमची तयारी असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

या महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष भारतीय जनता पक्षच असून विरोधकांना मुंगेरीलालके हसी सपने पडत आहेत.  त्यांनी ती पाहावित, जनता आमच्यासोबत आहे. असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली म्हणून हे महासंमेलन मावळमध्ये होत आहे. मावळ , शिरुरमधील जनतेचा आशीर्वाद घेऊन २०१९ मध्ये विजय संपादन करणार आहोत असंही यावेळी मुख्यमंत्री बोलले आहेत.

दरम्यान नेहमीच भाजपवर टीका करणा-या उद्धव ठाकरे यांची भाषा मात्र आज सकाळी समोपचाराची वाटली. नाशिकमधील कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी आयोध्येला एकत्रित जाऊ असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे शिवसेना-भाजप एकत्र येतील असं बोललं जात होतं. परंतु भाजपच्या मेळाव्यात मात्र मुख्यमंत्र्यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे.

विशेष म्हणजे लोकसभेच्या मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग आप्पा बारणे आणि शिरुर मतदारसंघातून शिवाजीराव आढाळराव पाटील हे खासदार आहेत. असं असताना याच मतदारसंघात भाजपकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षामध्ये युतीबाबत अनिश्चितता असून एकप्रकारे भाजपनं शिवसेनेला आपलं शक्तिप्रदर्शन दाखवलं असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS