मराठा तरुणांना तात्काळ कर्ज देण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश !

मराठा तरुणांना तात्काळ कर्ज देण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश !

मुंबई – मराठा तरुणांची कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा तरुणांची कर्ज प्रकरणे सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांकडे पाठविण्यात आली  आहेत, त्यांनी ती तत्काळ मंजूर करावीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच जी महाविद्यालये फीवरून विद्यार्थ्यांची अडवणूक करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचनाही  मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागास दिली आहे. राज्यभरात सुरु  असलेल्या आंदोलनामुळे मराठा तरुणांना काहिसा दिलासा देण्याया प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

दरम्यान आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यभरात मराठा समाजाचे दोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान मराठा समाजानं आरक्षणासह सरकारकडे अन्य मागण्या केल्या आहेत. बँका कर्जे देताना मालमत्ता तारण मागत अडवणूक करत आहेत तसेच महाविद्यालयाकडूनही फीसाठी अडवणूक केली जात असल्याची सकल मराठा क्रांती मोर्चानं मुख्य तक्रार केली आहे. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा आढावा त्यांनी घेतला. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व बँक असोसिएशन, राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यानी हे आदेश दिले आहेत.

 

COMMENTS