नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य !

नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य !

नागपूर – कोकणातील नाणार प्रकल्पाला विरोधक आणि शिवसेनेकडून होत असलेला वाढता विरोध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. विरोध होत असेल तर नाणार प्रकल्प लादणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत म्हटलं आहे. तसेच या प्रकल्पाबाबत सर्व प्रेझेंन्टेशन दिल्यानंतर सर्वांचं मत घेऊ आणि त्यानंतरच या प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान समृध्दी महामार्गालाही असाच विरोध करण्यात आला होता. परंतु आम्ही तो चर्चेनं प्रश्न सोडवला असून या महामार्गासाठी आता 93 टक्के जमीन अधिगृहित झाली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबतही सर्व पक्षांसोबत चर्चा करुन आणि नागरिकांना समजावल्यानंतरच आम्ही पुढची भूमिका घेणार आहोत. तसेच सगळ्यांच्या शंकांचं निरसन झाल्यानंतरच या प्रकल्पाबाबत पुढचं पाऊल टाकण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच गुजरात आणि आंध्र प्रदेशने ही रिफायनरी त्यांच्याकडे व्हावी अशी मागणी केली होती, परंतु हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला असून आपल्याकडे तीन लाख कोटींची गुंतवणूक आहे. तसेच नाणार ही ग्रीन रिफायनरी असून राज्यासाठी ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळेच राज्य सरकारनं नाणारजवळच्या जमिनीचं अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS