आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी –प्रफुल्ल पटेल

आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी –प्रफुल्ल पटेल

गोंदिया – आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये  आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. तसेच याबाबत नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पटेल यांनी दिली आहे.

दरम्यान सध्या भंडारा – गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार असून केवळ हीच निवडणूक नाही तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढावं याबाबत चर्चा झाली असून गेल्यावेळी भंडारा – गोंदियाची जागा राष्ट्रवादीने तर पालघरची जागा काँग्रेसने लढवली होती. त्या जागा तशाच राहतील, असा निर्णय दोन्ही पक्षाचा झाला असल्याचंही पटेल यांनी म्हटलं आहे.

तसेच भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. येत्या 9 तारखेला उमेदवार घोषित करु, असं प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर खासदारकीचा राजीनामा देत, भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नसून ते माझे लहान भाऊ असल्याचंही पटेल यांनी म्हटलं आहे.

COMMENTS