निरंजन डावखरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचा आणखी एक नेता भाजपच्या वाटेवर ?

निरंजन डावखरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचा आणखी एक नेता भाजपच्या वाटेवर ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. डावखरे यांच्यानंतर ठाणे जिल्ह्यातील आणखी एक नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. आज निरंजन डावखरे हे मुंबई भाजप कार्यालयात आले तेंव्हा त्यांना सोडायला नरेद्र पाटील आले होते. त्यामुळे पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांना या प्रवेशाबाबत छेडले असता अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं उत्तर दिलं. नरेद्र पाटील यांनीही फोनवरुन याबाबत बोलण्यास नकार दिला. नरेंद्र पाटील यांच्या आमदारकीची मुदत येत्या जुलैमध्ये संपत आहे. भाजप त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ शकते. नरेंद्र पाटील यांच्यासोबत नवी मुंबईतील माथाडी कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. पाटील यांच्या पत्नीला भाजपकडून नवी मुंबईतील ऐरोली किंवा सातारा जिल्ह्यातील पाटणमधून विधानसभेची उमेदवारी मिळू शकते अशीही चर्चा आहे.

नरेंद्र पाटील हे मुळचे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आहेत. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. नवी मुंबईतील माथाडींचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नवी मुंबईत माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. त्यावर पाटील यांचे वर्चस्व आहे. त्यासोबत पाटील यांचं त्यांच्या सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघातही संपर्क असतो. त्यामुळे तिथेही त्यांचं ब-यापैकी काम आहे. पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यास याचा मोठा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

COMMENTS