मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी केली ‘ही’ मागणी!

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी केली ‘ही’ मागणी!

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.मुंबईत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ही भेट झाली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरी, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. चक्रीवादळ गेल्यानंतर 10-11 दिवसांनी सरकारचं अस्तित्वच दिसत नाही, वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नसल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

चक्रीवादळानंतर 10-11 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्याप सरकारचं अस्तित्व काहीच दिसत नाही. वादळग्रस्तांना मदत मिळालेली नाही. आता सरकारने तातडीची मदत देऊन कोकणाला उभं करण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची गरज आहे. कोकण चक्रीवादळाच्या दौऱ्यात माझ्यासमोर जे सत्य आलं, ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. वादळग्रस्तांना एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. सरकारचं अस्तित्व कुठेच दिसत नाही, लोकांना शाळांमध्ये कोंबून ठेवलं आहे, विदारक चित्र उद्धवजींसमोर मांडलं. लोकांना तात्काळ रोख रक्कम मिळायला हवी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

तसेच कोकणातील झाडं उन्मळून पडली आहेत, हेक्टरी 50 हजारांची मदत तोकडी आहे. झाडं पुढची १० वर्षे उत्पादन देऊ शकणार नाहीत. त्यामुळे फळ पिकांची योजना लागू करुन त्यांना मदत करणे आवश्यक आहे.पत्र्याच्या शिट्सचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे तात्काळ ३-४ कंपन्यांशी करार करुन पत्र्यांची किंमत घोषित करावी, त्यामुळे काळाबाजार थांबेल
असंही ते म्हणाले आहेत.

COMMENTS