बाळासाहेब आमचे मार्गदर्शक, त्यांच्या विचारांसाठी संघर्ष करत राहू

बाळासाहेब आमचे मार्गदर्शक, त्यांच्या विचारांसाठी संघर्ष करत राहू

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास व्हिडिओ शेअर करून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाचे व विचारांचे कौतुक करताना फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख आमचे मार्गदर्शक असा केला आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ‘आम्ही कुठेही असलो तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला आदरस्थानीच राहतील. त्यांच्या विचारांसाठी संघर्ष करत राहू. तुम्ही त्यांच्या विचारांत मिसळ केली असेल, आम्ही नाही केली. बाळासाहेब हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होतं,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेला टोले हाणले आहेत.

चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक असे फडणवीस यांनी बाळासाहेबांचं वर्णन केले आहे. बाळासाहेबांच्या काही भाषणांसह स्वत:च्या भाषणांतील काही वाक्येही या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांनी शेअर केली आहेत. ‘अलीकडच्या राजकारणात नेत्यांची मनं छोटी-छोटी होतात. ते आपल्यापलीकडं पाहू शकत नाहीत. पण बाळासाहेबांचं मन देखील राजासारखं होतं. निवडणूक हरो किंवा जिंको, बाळासाहेब जे चैतन्य निर्माण करायचे ते अप्रतिम होतं. ते येऊन गेले की जिंकल्याची मजा यायची. ही त्यांची ताकद होती,’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

‘जनतेनं विश्वासानं तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता? पैशासाठी? पैशाचे लाचार व्हाल तर शिवरायांचं नाव घेऊ नका. भगवा झेंडा हातात ठेवू नका. हे गुण मराठ्यांच्या रक्तात असता कामा नयेत. तुमचे तेज तुम्हाला कायम ठेवलं पाहिजे. तुमच्याकडे आदरानं लोक पाहताहेत तो आदर तसाच ठेवा…’ बाळासाहेबांच्या भाषणातील ही निवडक व सूचक वाक्य फडणवीस यांनी शेअर केली आहेत.

COMMENTS