‘धनंजय मुंडेंच्या रूपाने नगद नारायण पावला’, पालकमंत्री म्हणून पहिलीच सही त्या अंधांच्या मदतीसाठी!

‘धनंजय मुंडेंच्या रूपाने नगद नारायण पावला’, पालकमंत्री म्हणून पहिलीच सही त्या अंधांच्या मदतीसाठी!

बीड – सोशल मीडियावर प्रचंड गाजलेल्या बीड तालुक्यातील साक्षाळ पिंप्री येथील त्या पाच अंध व्यक्तींना तसेच सबंध बीड जिल्ह्याला आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गतिमान कारभाराची प्रचिती आली.दोन दिवसांपूर्वी आर्थिक मदतीची घोषणा, समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची तत्पर कारवाई आणि रात्री १ वाजता पालकमंत्री म्हणून पहिली सही देऊन अवघ्या ४८ तासात त्यांना प्रत्यक्ष मदतीचे धनादेश वाटप! होय हे सत्य आहे!

आज पोलीस मुख्यालयाच्या मैदानात आयोजित शासकीय ध्वजारोहनाच्या मुख्य कार्यक्रमात साक्षाळपिंपरी येथील त्या पाच अंध जणांना शासकीय मदतीच्या प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

समाजामध्ये दृष्टिहीन म्हणून वावरणाऱ्या निराधार यादव क्षीरसागर, विठ्ठलबाई क्षीरसागर, सम्राट क्षीरसागर, राजाबाई साठे, मुरलीधर साठे, या पाचही लोकांना प्रजासत्ताक दिनी आयोजित समारंभात हे धनादेश म्हणजे अनपेक्षित आणि सुखद धक्काच म्हणावा लागेल.

दोन दिवसांपूर्वी बीड येथील शासकीय विश्राम गृहात या 2 अंध कुटुंबातील 6 व्यक्तींनी सर्वांनी एकत्रित ना. मुंडे यांची भेट घेतली होती, त्यावेळी श्री. मुंडे यांनी समाज कल्याण उपायुक्त सचिन मडावी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एडके यांना निर्देशित करून दिव्यांग बीज भांडवल योजना व समाज कल्याण विभागाच्या शेष निधीतून भरीव आर्थिक मदत करण्याबाबत सूचित केले होते.

त्यानंतर काल (दि. २५) तब्बल रात्री एक वाजता सबंधितांना पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या ‘अपंग कल्याण’ निधीतून प्रत्येकी एक लक्ष रुपये मदतीच्या आदेशावर पालकमंत्री म्हणून पहिली सही ना. मुंडे यांनी केली. तर त्याच परिवारातील सहावा सम्राट याला १८ वर्ष पूर्ण नसल्याने मदत निधी न देता त्याचा शिक्षण व पूरक खर्चसाठी शिष्यवृत्ती देण्याचेही घोषित केले आहे.

त्यानंतर आज ना. मुंडे यांच्या हस्ते त्या पाचही जणांना ध्वजारोहण समारंभात या मदतनिधीच्या प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे आज वाटप करण्यात आले. यावेळी श्री. मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, समाज कल्याण उपायुक्त सचिन मडावी, समाज कल्याण अधिकारी श्री राजू येडके, आ. संदीप क्षीरसागर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या शिवाजी शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांच्या रूपाने नगद नारायण पावला – दृष्टीहीनांच्या भावना

नारायण गडाच्या पायथ्याशी वास्तव्य असणाऱ्या व समाजाकडून कायम उपेक्षा मिळालेल्या त्या पाचही जणांनी पालकमंत्र्यांकडून इतक्या तत्परतेने मिळालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करताना भावुक होऊन ‘मुंडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला श्री. नगद नारायण पावले!” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या गतिमान कारभाराचे व त्यांच्यातील संवेदनशील व्यक्तिमत्वाचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.

COMMENTS