धनंजय मुंडेंच्या सुचनेनंतर मांडवजाळी येथील भिल्ल वस्तीवर पोहचले पाणी !

धनंजय मुंडेंच्या सुचनेनंतर मांडवजाळी येथील भिल्ल वस्तीवर पोहचले पाणी !

२३ कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके धान्यही केले वाटप - डॉ. सचिन मडावी

बीड – बीड शहरापासून जवळच असलेल्या डोंगराळ भागात मांडवजाळी येथे २३ कुटुंबांची भिल्ल समाजाची वस्ती आहे या वस्तीवर राहणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची माहिती मिळताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी या वस्तीवर ७००० लिटर चे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे.

या वस्तीवरील सर्व 23 कुटुंबांना रेशन कार्ड नसल्यामुळे एक महिना पुरेल इतके धान्य वाटप केले असून जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. प्रकाश आघाव पाटील यांच्याशी बोलून या कुटुंबांना रेशन कार्ड देण्याबाबत विनंती केली आहे, तसेच या वस्तीवरील मुलांना समाज कल्याणच्या आश्रमशाळेत प्रवेश दिला जाईल, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली.

बीड शहरापासून जवळ असलेल्या या डोंगराळ भागात स्थित वस्तीवर ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे ना ठीक रस्ता, अशा परिस्थितीत जवळपास सर्वच ऊसतोड कामगार असलेल्या या भिल्ल वस्तीवर पिण्याच्या पाण्याचे टँकर व धान्य समाज कल्याण विभागाचे अधिकारी स्वतः घेऊन आल्याने वस्तीवरील नागरिकांनी आनंद व आभार व्यक्त केले. दरम्यान येथे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी आपण गटविकास अधिकारी श्री. तुरूंकमारे यांच्याशी चर्चा केली असल्याचेही डॉ. मडावी यांनी सांगितले; यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव येडके, सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे आदी उपस्थित होते.

या वस्तीवर अत्यंत तत्परतेने पिण्याच्या पाण्याची सोय करून धान्य उपलब्ध केल्याबद्दल मुंडेंनी समाज कल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS