धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश, नाथ्रा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीचा शासन निर्णय जाहीर !

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश, नाथ्रा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीचा शासन निर्णय जाहीर !

बीड, परळी – मौजे नाथ्रा तालुका परळी वैजनाथ येथे अखेर प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून, त्याचा शासन निर्णय आज प्रसिध्द झाला आहे.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे नाथ्रा व परिसरातील 30 हजार लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली असून, या बद्दल जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रसचे युवक प्रदेशाध्यक्ष अजय मुंडे व नाथ्रा ग्रामस्थांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.

नाथ्रा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू व्हावे यासाठी 01 नोव्हेंबर रोजी मुंडे यांनी आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांना पत्र पाठवले तसेच त्यांच्याशी चर्चा करून त्याच दिवशी नाथ्रा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यासंदर्भात वेगळी नस्ती सादर करण्याचे आदेश मंत्री महोदयांकडून विभागाला गेले.

त्यानंतर विभागाने मागील दिड महिन्यात तातडीने कारवाई करून नाथ्रा प्राथमिक आरोग्य पथकाचे श्रेणी वर्धन करून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करण्यासंदर्भात प्रधान सचिवांना प्रस्ताव पाठवला. सदर प्रस्ताव प्रधान सचिव व मंत्र्यांनी मान्य करून त्यासंबंधीचा शासन निर्णय आज शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

अवघ्या दोन महिन्यात हे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करून घेण्यात मुंडे यांना यश आले आहे. त्यामुळे नाथ्रा व परिसरातील 30 हजार नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणार असून, या बद्दल अजय मुंडे व समस्त नाथ्रा ग्रामस्थ यांनी धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

COMMENTS