सुडाचे राजकारण काय करता विकासाचे राजकारण करून दाखवा – धनंजय मुंडे

सुडाचे राजकारण काय करता विकासाचे राजकारण करून दाखवा – धनंजय मुंडे

परळी – गल्लीपासुन दिल्ली पर्यंत असलेल्या सत्तेचा वापर सुडाचे राजकारण करण्यासाठी होत असल्याचा आरोप करून सुडाचे राजकारण काय करता संधी मिळाली आहे तर विकासाचे राजकारण करून दाखवा असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले.

परळी तालुक्यातील औरंगपुर येथील पाण्याच्या टाकीच्या (जलकुंभ) कामाचा शुभारंभ धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, पंचायत समिती सभापती मोहनराव सोळंके, उपसभापती पिंटु उर्फ बालाजी मुंडे, माजी उपसभापती प्रभाकरराव पौळ, जानिमीयाँ कुरेशी, राजाभाऊ पौळ, बाबासाहेब काळे, चंद्रकांत कराड, राम किरवले, भरत सोन्नर, देवराव काळे, इम्रान पठाण, अर्जुनराव घोळवे, हरिभाऊ बडे, नवनाथ गर्जे, राधाकिशन दराडे, हरिभाऊ दराडे, ज्योतीबा लहाने, सरपंच अश्विनी कांबळे, उपसरपंच भास्कर देवकते, शंकर देवकते, कुंडलिक लहाने, अमृत नागरगोजे आदी उपस्थित होते.

एकीकडे आपल्याकडे कोणतीही सत्ता नसतांना मतदारसंघात आपण विकास कामे करीत आहोत. दुसरीकडे इथले सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र सुडाचे राजकारण करत आहे. उद्या आम्ही सत्तेवर आल्यावर असेच वागलो तर चालेल का..? असा प्रश्न उपस्थित करीत राजकारण हे फक्त निवडणुकी पुरते असावे विकासात राजकारण करू नका असा सल्ला मुंडे यांनी दिला.

केदार कुटुंबियांचे सांत्वन

दरम्यान या कार्यक्रमापुर्वी मुंडे यांनी रेवली येथील मनोहर केदार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मनोहर केदार यांच्या वडिलांचे नुकतेच दुःखद निधन झाले. मुंडे यांनी केदार कुटुंबियांचे सांत्वन केले.

COMMENTS