नोकरीही नाही, छोकरीही नाही, मोदींनी तरुणांना फसवले, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल !

नोकरीही नाही, छोकरीही नाही, मोदींनी तरुणांना फसवले, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल !

औरंगाबाद – औरंगाबाद येथे मराठवाडा विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यादरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “तरुणांनो 2014 च्या निवडणूका आठवा, एकतीस दिवसांच्या आंदोलनातून परिस्थिती बदलली होती, देशात निर्माण झालेल्या मोदी लाटेत तुम्हीही वाहत गेलात. दीडफुट उड्या मारत तरुणाईने मोदी मोदीचे नारे दिले, आता त्यातले अनेकजण आमच्याकडे आले आहेत. दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितले. तुम्हाला वाटले नोकरी नही मिलेगी तो, छोकरी कैसे मिलेगी आणि छोकरी नाही मिळाली तर हम दो हमारे कैसे होगे. तुमच्या सुखी संसाराचे स्वप्न भंगले आहे. मोदींनी देशातील 55 कोटी तरूणांना फसवले आहे,” असा जोरदार टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

दरम्यान मोदी लाटेवर स्वार झालेल्या तरुणांना त्यांनी आपल्या भाषणातून चांगलेच चिमटे काढले. ते म्हणाले, ”मोदी बाबाने देशातील सव्वाशे कोटी लोकांना फसवले, त्यात तरुणही फसले. आज चार वर्षानंतरची परिस्थीती काय तर नोकरीही नाही, छोकरीही नाही आणि हम दो हमारे ही नाही. बर आता गाडीत पेट्रोल टाकून आपापल पहावं, तर ती सोय देखील मोदींनी ठेवली नाही. पेट्रोल शंभरी पार करायच्या तयारीत आहे.”

ते पुढे म्हणाले, “पण यात तुमचा दोष नाही सोशल मिडियावरच्या प्रचाराला तुम्ही भुललात. पण आता तुमच्या मनात असलेली आग येणाऱ्या काळात दिसली पाहिजे, सरकारच्या विरोधात पेटून उठलात तरच तुमच्या अंगात तरुणांच रक्त आहे अस समजल जाईल. कारण युवकांची फळी मजबूत असेल त्या पक्षालाच देशात आणि राज्यात सत्तेवर येता येईल.”

खोटं बोलून सत्तेत आले

आघाडी सरकारच्या काळात पेट्रोल 50-60 रुपये होते. त्यात काही पैशांची वाढ झाली की भाजपचे चार-पाच पोट्टे पेट्रोल पंपावर येऊन आंदोलन करायचे. दुसऱ्या दिवशी त्याच्या बातम्या, फोटो वर्तमान पत्रात छापून यायचे. आज पेट्रोल 92 रुपयांवर पोहचले, पण त्यावर ना केंद्रातील सरकार बोलायला तयार ना राज्यातील. शेजारच्या कर्नाटक सरकारने पेट्रोलचे दर कमी केले, पण इकडे महाराष्ट्रातील सरकारला ते कमी करता येत नाहीये,” असे सांगत खोटं बोलून, फेकून देखील आज भाजप सत्तेवर आहे, आणि आम्ही लोकांची काम करूनही सत्तेच्या बाहेर अशी मनातली सल देखील धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुथ याद्यांचा नीट अभ्यास करावा. आपल्याला पडणारे मतदान, न पडणारे मतदान, काठावरचे मतदार अशी वर्गवारी करावी. तसेच नव्या मतदारांची नोंदणी करण्यावर सर्वाधिक भर द्यावा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी दिला. पहिल्यांदा जो पक्ष नव्या मतदारांची नोंद करतो ते मतदार कधीच त्या पक्षापासून लांब जात नाही असा माझा अनुभव आहे. त्यामुळे नवीन मतदार नोंदणीवर भर द्या असे आवाहन करतांनाच “चलो आज अपना हुनर आजमाते है, तुम तीर आजमाओ हम जिगर आजमाते है’ असा शेर सादर करत मुंडे यांनी भाषणाचा शेवट केला

COMMENTS