अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांकडून  धनंजय मुंडेंनी 3 लाख 50 हजारांचा भाजीपाला घेतला विकत !

अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांकडून धनंजय मुंडेंनी 3 लाख 50 हजारांचा भाजीपाला घेतला विकत !

बीड, परळी – भाजीपाला विकण्यासाठी तालुक्याला भाजीपाला मंडईमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतातील आपला भाजीपाला विषम संख्येच्या पार्श्वभूमीवर तोडणी केलेली होती कारण भाजी मंडई चालू ठेवण्यात येणार होती.परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी बीट बंद करण्याचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक आदेशित केल्याने चांगलीच अडचण झाली होती. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ही बाब कळताच परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तो संपूर्ण 3 लाख 50 हजार रुपयांचा भाजीपाला बाजार भावानुसार विकत घेतला आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले.

धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेमार्फत त्यांनी तो संपूर्ण भाजीपाला विकत घेऊन परळी शहरातील गरजू नागरिकांना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकरवी मोफत वाटप केला आहे.

त्याचे झाले असे की परळी शहरात तालुक्यातून बटाटे, कांदे, कांद्याची पात, वांगे, कारले, पत्ता गोभी, गाजर, काकडी, शेपू, पालक, कोथिंबीर, टोमॅटो, दोडका, शेवगा आदी भाजीपाला मोठ्या प्रमाणावर येथील बाजार समितीच्या बीटवर ठोक विक्रीसाठी आणला गेला होता. मात्र त्या ठिकाणी गर्दी वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बीट बंद करण्याचे आदेशीत केले. रात्रीपासून भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांवर आता मोठ्या मेहनतीने पिकवलेला भाजीपाला फेकून देण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

त्याचवेळी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्याकरवी मुंडेंना याबाबत माहिती मिळाली, तेव्हा नियमही मोडायचा नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसानही होऊ द्यायचे नाही म्हणून त्यांनी तात्काळ तो सर्व भाजीपाला विकत घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे ठरवले.

त्याबरोबर बिटवर विक्रीसाठी रात्रभर आलेला शेकडो किलो भाजीपाला मुंडेंनी नाथ प्रतिष्ठान मार्फत 3 लाख 50 हजार पेक्षा अधिक रक्कम बाजार भावानुसार अदा करत खरेदी केला.

तसेच हा भाजीपाला समान वर्गीकरण करत शहरातील सर्व प्रभागांमध्ये प्रतिकुटुंब अंदाजे 5 किलो प्रमाणे सुमारे 2000 गरजू कुटुंबांना मोफत नगरसेवक व नाथ प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांचेमार्फत घरपोच वाटप करण्यात आला.

प्लास्टिक बंदी असल्यामुळे हा भाजीपाला वितरित करण्यासाठी प्रचार साहित्य वाटण्यासाठी पूर्वी निवडणूक काळात छापण्यात आलेल्या कापडी पिशव्यांचा वापर करण्यात आला तसेच सोशल डिस्टन्सिंगचेही काटेकोर पालन करण्यात आले.

दरम्यान आपल्या संवेदनशील स्वभावामुळे कायम चर्चेत राहणारे धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या नाशवंत शेतीमालाला असा न्याय मिळवून दिल्यामुळे धनंजय मुंडे यांचे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत तसेच सोशल मीडियातून त्यांचे कौतुक होत आहे.

COMMENTS