दिलीप सोपल यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक, का होतोय सतत पराभव ?,  वाचा महापॉलिटिक्सचे विश्लेषण !

दिलीप सोपल यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक, का होतोय सतत पराभव ?,  वाचा महापॉलिटिक्सचे विश्लेषण !

प्रशांत आवटे

बार्शी – नगरपालिका, पंचायत समिती, आणि आता कृषी उत्पन्न बाजार समिती, अशा सलग 3 निवडणुकीत आमदार दिलीप सोपल यांचा पराभव झाला आहे. एकेकाळी तालुक्याच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या सोपल यांच्या पराभवामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत मरगळ निर्माण झाली आहे. पण या सगळ्या पराभवाला त्यांचं नियोजन शून्य काम, कार्यकर्त्यांमध्ये असलेला विसंवाद, अंतर्गत वाद आणि कुटुंबाकडून मिळत नसलेली साथ  ही म्हणावी लागतील. विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर नगरपालिका निवडणूक सहज जिंकू असा सोपल यांना ठाम विश्वास होता, पण तसं झालं नाही आणि नगरपालिकेत त्यांचा पराभव झाला.

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत वादामुळे त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांच्या सह अनेकांनी त्यांची साथ सोडून राऊत गटात प्रवेश केला. तरुण पिढीतील तसेच शहरात वर्चस्व असलेली ही पिढी गेल्याने 10 वर्ष नगरपालिका ताब्यात असलेल्या सोपल यांचा निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यानंतर झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं. 15 वर्षांपासून राऊत यांचं ग्रामीण भागावर मोठं वर्चस्व आहे. त्यात मागच्या पंचवार्षिकला सोपल यांना  जिल्हापरिषदेच्या फक्त एक जागेवर समाधान मानावे लागल होत. पण यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांना झेडपीच्या 3 जागा मिळाल्या, तर पंचायत समितीच्या 5 , तसेच सभापती साठी राखीव असलेल्या जागेवर त्यांनी बाजी मारली. पण ग्रामीण भागात  भाजप विरोधी वातावरण, त्यातच राऊत यांनी नुकताच भाजापात केलेला प्रवेश याचा फायदा त्यानं घेता आला नाही. त्यामुळे पंचाय समितीमध्ये बहुमत मिळवता आलं नाही.

बाजार समिती निवडणुकात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना मतदान करण्याचा हक्क मिळाला होता. आजपर्यंत विकास सोसायट्या आणि ग्रामपंचायतचे सदस्यां मार्फत हे मतदान होत असे. गेल्या 25 वर्षांपासून बार्शी बाजार समिती सोपल यांच्या ताब्यात होती. व्यापारी, हमला-तोलार, आणि शेतकरी गण यातून सभासद निवडून द्यायचे होते, त्यात व्यापाऱ्यांशी असलेले त्यांचे जवळचे संबंध, अनेकांना बाजार समितीमध्ये लावलेल्या नोकऱ्या यामुळे ते बाजारसमिती आरामात जिंकतील अस सर्वांना वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. व्यापारी गणाने त्यांना मोठा फटका दिला. तर शेतकरी गणात कार्यकर्त्यातील अंतर्गत राजकारण, नियोजनशून्य कारभार भोवला. अनेक कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या मागील पराभवाचा सूड उगवण्याची नादात विरोधात काम केलं. ज्या वैराग भागाने सोपल यांना नेहमी साथ दिली तिथं देखील त्यांना मोठा फटका बसला. युवराज काटे, श्रीमंत थोरात, निरंजन भूमकर, राजाभाऊ चव्हाण ही सोपल यांची ग्रामीण भागातील मजबूत फळी, मात्र यांच्या मतदार संघात देखील विजयी मतदान करण्यात या नेत्यांना अपयश आलं. विशेष म्हणजे दिलीप सोपल यांचे पुतणे योगेश सोपल यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आणि हा पराभव कार्यकर्त्यांच्या मोठा जिव्हारी लागला.

सगळ्या पराभवात जसा कार्यकर्त्यांचा दोष दिसतोय तसा सोपल यांच्या घरातुन देखील   साथ मिळत नसल्याच स्पष्ट दिसून येतंय, बाजार समितीच्या निवडणुकीत सोपल यांचे नातू आर्यन सोपल यांनी स्टार प्रचारक म्हणून काम केलं पण ज्या योगेश सोपल यांनी निवडणूक लढवली ते फक्त निवडणुकीपुरतच बाहेर पडतात, इतर वेळी कार्यकर्त्याशी संवाद साधणे, त्यांच्या अडी- अडचणी सोडवणे, ग्रामीण भागात दौरे करणे, शहरातील मुख्य भागात जाऊन लोकांशी संवाद करणे अस एकही काम ते करताना दिसत नाहीत. सोपल यांच्या वयाच्या मनाने या गोष्टी करणं त्यांना तितकस शकय नाही, पण ही जबाबदारी मात्र घरातील कोणी घेताना दिसत नाही.

सोपल यांच्यावर आर्यन कारखान्यावरून  बरीच टीका झाली. ज्या उपळे दुमाला गणातून सर्वात जास्त शेतकऱ्यांची ऊस बिल थाकित आहेत तिथं व ज्या भागातून आर्यन कारखाना विरोधी आंदोलन सुरू झाले त्या कारी गणातून सोपल यांचाच उमेदवार निवडून आला. मात्र एकूणच विचार करता कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार करण्यात सोपल यांना आलेलं अपयश हेच त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण आहे. शहरात सोपल यांचं कार्यकर्त्यांच जाळं कमकुवत आहे. विशेषतः उपळाई रोड, अलीपुर रोड आणि इतर काही भागात त्यांच्याकडे चांगले कार्यकर्ते दिसत नाहीत. ग्रामीण भागात ज्यांच्यावर जास्त भिस्त आहे त्यापैकी कोणी विरोधी पक्षात गेल्यास त्याची पोकळी भरून काढणार एकही कार्यकर्ता नाही. त्यामुळं शहरातील कार्यकर्त्यांबरोबर ग्रामीण भागात देखील दुसरी फळी निर्माण करण्यात त्यांना अपयश आलं आहे. त्याच कारणाने त्यांचं नियोजन ढासळत आहे.

या जरी दिलीप सोपल यांच्या कमकुवत बाजू असल्या तरी राजकारणातील प्रचंड अनुभव, प्रचंड जनसंपर्क, वक्तृत्व, तालुक्यातील केलेली विकासकामे या जमेच्या बाजू आहेत. इतर निवडणुकीमध्ये कार्यकर्ते एकमेकांना पाडण्याचा प्रय़त्न करतात. मात्र हे कार्यकर्ते जेंव्हा सोपल विधानसभेला उभे असतात तेंव्हा पाडापाडीचे राजकारणत करत नाहीत. तसंच सोपल यांच्याबद्दल मतदारसंघात एक सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यामुळे सलग तीन निवडणुकीत पराभव झाला असला तरी येणा-या विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम होईल असं म्हणता येणार नाही. शेतकरी, दलित, मुस्लिम यांच्यात भाजप विरोधात असलेलं वातावरण याचा फायदा सोपल यांना होण्याची शक्यता आहे. आता विधानसभेला काय होतं ते पाहण्यासाठी आपल्याला 2019 टी वाट पहावी लागेल.

COMMENTS