मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, भाजपकडून ‘ही’ दोन नावे निश्चित !

मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, भाजपकडून ‘ही’ दोन नावे निश्चित !

मुंबई – गेली अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु आहे. हा विस्तार कधी होणार याबाबतही तर्कवितर्क लावले जात होते. परंतु राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असून याबाबत राज्य सरकारनं तयारी सुरु केली असल्याची माहिती आहे. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली आहे. कोणाला कोणते पद द्यायचे याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे.

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा विस्तार उद्याच होणार आहे. उद्या विस्तार झाला की सोमवारपासून सुरु होणाय्रा अधिवेशनात नवे मंत्री सहभाग घेणार आहेत. दरम्यान भाजपकडून अमरावतीचे आमदार अनिल बोंडे यांचे नाव विस्तारात निश्चित करण्यात आले आहे, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार अतुल सावे यांचेही नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांसोबत आणखी कोण कोण मंत्रीपदाची शपथ घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारलं?

उपमुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेत अंतर्गत कलह वाढला आहे. यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंच्या नावाची चर्चा आहे. पण यावरुन नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केल्याचं दिसत आहे. तसंच ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे या सर्व बाजूंचा विचार करता उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS