गुजरातमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी का तुटली ?  राष्ट्रवादी सर्व 182 जागांवर लढणार का ?  आघाडी तुटण्याचा फायदा तोटा कोणाला होणार ?  वाचा सविस्तर

गुजरातमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी का तुटली ?  राष्ट्रवादी सर्व 182 जागांवर लढणार का ?  आघाडी तुटण्याचा फायदा तोटा कोणाला होणार ?  वाचा सविस्तर

अहमदाबाद – गुजरातमध्ये काँग्रेससोबतची आघाडी तुटल्यानंतर सर्व 182 जागा लढवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलाय. काँग्रेसोबत बोलणी सुरू होती. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 9 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 2 जागांवर पक्षाला विजय मिळाला होता. यावेळी गेल्यावेळच्या 9 आणि आणखी तीन चार जागा मिळाव्या अशी राष्ट्रादीची अपेक्षा होती. मात्र काँग्रेसनं 9 जागा देण्यासही असमर्थता दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच चिडलेल्या राष्ट्रवादीने गुजरातमध्ये स्वबळावर 182 जागा लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याच वर्षी राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या एका आमदाराने भाजपला मदत केल्याने दोन्ही पक्षात दुरावा निर्माण झाला होता. मात्र तरीही गेल्याच आठवड्यात शरद पवार यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार बोलणी झाली. मात्र त्यामध्ये तोडगा निघाला नाही. राष्ट्रवादीला जागा सोडण्यापेक्षा हार्दिक पटेल यांच्या पाटीदार समाजाला जागा सोडल्यास अधिक फायदा होईल असं काँग्रेसचं गणित असल्याचं बोललं जातंय. तसंच जिंकूण आल्यावरही राष्ट्रादीचे आमदार काँग्रेससोबत राहतीलच याची खात्री नसल्यामुळेच काँग्रेसने राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीसाठी फारसा रस दाखवला नाही अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व 182 जागा लढवण्याचा इशारा दिला असला तरी एवढ्या कमी कालावधीत त्यांना सर्व जागांवर उमेदवार तरी मिळतील का ? हा प्रश्नच आहे. कदाचित भाजप, काँग्रेस आणि पाटीदार समाजाचे तिकीट न मिळालेले इच्छुक अशी नाराजांची मोट राष्ट्रवादीकडून बांधली जाऊ शकते.

गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तसा फारसा बेस नाही. काही पॉकेट्समध्येच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. राष्ट्रवादीने जरी नाराजांची मोट बांधली तरी त्याचा फारसा फायदा तोटा कोणत्याच पक्षाला होऊ शकणार नाही असे चित्र आहे. कारण जे नाराज आहेत ते कुठल्या ना कुठल्या चिन्हावर लढणार आहेतच. राष्ट्रवादीचे चिन्ह मिळाल्यानंतर त्यांना समान चिन्हावर लढता येईल एवढेच. सध्यातरी त्याचा फायदा तोटा फारसा संभवत नाही.

COMMENTS