पक्षातील गळती रोखण्यासाठी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक!

पक्षातील गळती रोखण्यासाठी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक!

जळगाव – भाजपची महत्त्वपूर्ण बैठक आज जळगावमध्ये पार पडत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्रासाठी कोअर कमिटीची बैठक होत आहे. जळगाव शहरातील बालांनी लॉन येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक, एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि कोअर कमिटी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपमधील अनेक नेते नाराज आहेत. ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर येत फडणवीसांवर टीका केली. तर दुसरीकडे, भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या समर्थकांना सूचक संदेश दिला आहे. त्यानंतर पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र फक्त पंकजा मुंडेच नाही तर राज्यातील भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बंडाचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पक्षातील नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपची आज जळगावात बैठक पार पडत आहे. या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS