कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे पडघम, जेडीएस आणि बसपा यांच्यात आघाडी !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे पडघम, जेडीएस आणि बसपा यांच्यात आघाडी !

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या मे मध्ये तिथे विधानसभेची निवडणूक होणार आहे. कर्नाटकातील माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दल आणि मायावती यांचा बहुजन समाज पार्टी यांच्यात आघाडी झाली आहे. दिल्लीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतिशचंद्रा मिश्रा आणि जेडीएसचे दानिश अली यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आघाडीबाबत माहिती दिली. ही आघाडी मे मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी तर असेलच शिवाय 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीतही असेल असंही दोन्ही पक्षांतर्फे सांगण्यात आलंय.

कर्नाटकात सध्या काँग्रेसचं सरकार आहे. भाजपनं काँग्रेसकडून सत्ता हस्तगत करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. मात्र भाजपात मोठ्या प्रमाणात गटतट असल्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करण्याचे संकेत दिले होते. येडीयुरप्पा यांना लिंगायत समाजातून पाठिंबा असला तरी त्यांच्या उमेवारीमुळे भाजपाचे इतर नेते त्यांना कशी साथ देतात त्यावरच भाजपचं यश अपयश अवलंबून आहे. तर काँग्रेस विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे.

बसपाने उत्तर प्रदेशातील सुरूवातीच्या काळातील सपाबरोबरची युती सोडली तर यापूर्वी निवडणुक पूर्व आघाडी केली नव्हती. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे बसपाने आता आपल्या निवडणूक व्युव्हरचनेत बदल केल्याचं दिसून येतंय. बसपाच्या या निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात सर्व पक्षांची मोट बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना खिळ बसू शकते.

COMMENTS