लालू प्रसाद यादवांच्या दोन मुलांत वाद, आरजेडीमध्ये खळबळ !

लालू प्रसाद यादवांच्या दोन मुलांत वाद, आरजेडीमध्ये खळबळ !

नवी दिल्ली –  लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांच्या एका वक्तव्याने राष्ट्रीय जनता दलात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय जनता दलामध्ये आपलेल्या दुर्लक्षित केलं जात असल्याचं वक्तव्य लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव आणि विहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी केलं आहे. मात्र आपल्यामध्ये आणि तेजस्वी यादव यांच्यात कुठलाही वाद नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तेजप्रताप यादव यांच्या वक्तव्याने पक्षात वादळ उठलं आहे.

पक्षात मला दुर्लक्षित केलं जात असून एकाकी पाडलं जात असल्याची आपली भावना झाली आहे. मात्र आपण पक्षात कुठली फूट पडेल असं वागणार नाही असंही तेजप्रताप म्हणाले. तेजस्वी यादव यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो असंही तेजप्रताप म्हणाले. पक्षातले काही नेते स्वतःच्या फायद्यासाठी दोन भावंडांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रय़त्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र त्या नेत्यांचा डाव कदापी यशस्वी होणार नाही असंही तेजप्रताप म्हणाले.

तेजप्रताप यादव यांचा निशाणा नेमका पक्षातल्या कुठल्या नेत्यावर आहे हे मात्र कळू शकलं नाही. तेजस्वी यादव हे तेजप्रताप यांचे लहान भाऊ आहेत. महागठबंधनच्या सराकरमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. तसंच सध्या ते विधान सभेतील विरोधी पक्षनेते आहेत. लालू प्रसाद यादव यांचे ते वारसदार समजले जातात. तेजप्रताप यांच्या वक्तव्यावर तेजस्वी यादव काय प्रतिक्रिया देतात याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. लालू प्रसाद यादव तेजप्रताप यांची कशी समजूत घालतात कि पक्षातील त्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो ते आता पहावं लागेल.

राष्ट्रीय जनता दलाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र तेजप्रताप यादव यांना दुर्लक्षित किंवा एकाकी पाडलं जात असल्याचा इन्कार केला आहे. तेजप्रताप यांचं गेल्याच महिन्यात लग्न झालं आहे. ते धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. विविध मंदिरांना ते नेहमीच भेट देत असतात. पक्षाला नुकसान होणार नाही यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत असंही तेजप्रताप यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षातला हा वाद आता पुढे काय वळण घेतो ते पहावं लागेल.

COMMENTS