मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा पेच सुटला, 27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा पेच सुटला, 27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका !

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला असून 27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली आहे.महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे.

दरम्यान विधानपरिषदेच्या 9 जागा 24 एप्रिलपासून रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी  लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने
विधानपरिषद निवडणूक घेण्यास अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे.

विधानपरिषदेच्या 9 सदस्यांचा कालावधी 24 एप्रिल रोजी संपला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच या रिक्त झालेल्या 9 सदस्यांच्या जागी नवीन सदस्य निवडून आणण्यासाठी निवडणुका होणार होत्या. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु असल्यामुळे ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. मात्र उद्धव ठाकरे यांना 27 मेपूर्वी विधीमंडळ सभागृहाचं सभाद आवश्यक आहे, त्यामुळे  राज्य सरकारकडून ही निवडणूक पुन्हा घ्यावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांना पत्र देण्यात आलं होतं. त्यामुळे आजच नव्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

COMMENTS