राज्यसभा निवडणूक – महाविकास आघाडीतील चौथ्या जागेवर तोडगा निघाला, शिवसेनेकडूनही उमेदवार जाहीर!

राज्यसभा निवडणूक – महाविकास आघाडीतील चौथ्या जागेवर तोडगा निघाला, शिवसेनेकडूनही उमेदवार जाहीर!

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी
शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेने काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांची नावं चर्चेत होती. मात्र निष्ठावंतांना डावलून शिवसेनेने आपली उमेदवारी प्रियांका चतुर्वेदी यांना जाहीर केली आहे. प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे त्यांनी थेट आदित्य ठाकरेंकडून ‘फील्डिंग’ लावली असल्याची चर्चा आहे.

दरम्यान राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीतील चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान ‘वेट अँड वॉच’वर होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याने फौजिया खानही आज उमेदवारी अर्ज भरत आहेत.

तर भाजपने पहिल्या यादीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता भागवत कराड यांनाही उमेदवारी देऊन 7 पैकी 3 जागांवर दावा केला आहे.

COMMENTS