काँग्रेसच्या बैठकीकडे पक्षातील ‘या’ आमदारांनी फिरवली पाठ, ज्येष्ठ नेत्यांची चिंता वाढली!

काँग्रेसच्या बैठकीकडे पक्षातील ‘या’ आमदारांनी फिरवली पाठ, ज्येष्ठ नेत्यांची चिंता वाढली!

मुंबई –  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीकडून राज्यभरात जिल्हा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेसकडूनही बैठका घेतल्या जात आहेत. परंतु काँग्रेसच्या या बैठकींना पक्षातील आमदारांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. बैठकांना आमदारच येत नसल्याने काँग्रेसच्या बड्या नेत्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे,  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासह दिग्गज नेते गेली दोन दिवस बैठका घेत आहेत. मात्र या बैठकांना महत्त्वाच्या आमदारांनीच पाठ फिरवलीय. वैयक्तिक कारणं देत अनेक आमदार या बैठकांना गैरहजर राहिले आहेत. या नेत्यांमध्ये विश्वजित कदम, सतेज पाटील, भारत भालके, संजय निरूपम सारख्या नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान लोकसभेतल्या पराभवामुळे राज्यातील काँग्रेसचे अनेक नेते नाराज आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष आणि पक्षप्रभारी या दोनही नेत्यांचा पराभव झाल्याने सर्वच पक्षात नाराजीचा सुरु आहे. अशातच काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या नेत्यांमधले काही नेते काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत अशीही चर्चा आहे. मुंबई विभागाच्या बैठकीसाठी मिलींद देवरा, प्रिया दत्त, उर्मिला मांतोडकर बैठकीस उपस्थित होते. पण निरूपम यांनी मुंबईत असून खरगेंच्या बैठकीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

COMMENTS