पाऊस जास्त झाल्यामुळेच मुंबई तुंबली – महापालिका

पाऊस जास्त झाल्यामुळेच मुंबई तुंबली – महापालिका

मुंबई – मुबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं होतं. पहिल्याच पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते तुंबले असल्याचं पहावयास मिळालं आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील हिंदमाता, धारावी, परेलमध्ये पाणी तुंबलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. परंतु याभागत 100 मी मी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने पाणी तुंबलं असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. जास्त पाऊस झाल्यामुळे मुंबई तुंबली असल्याचं वक्तव्य पालिकेचे उपायुक्त डॉ किशोर क्षीरसागर यांनी केलं आहे.

दरम्यान सध्या हिंदमाता परळ सायन रोड, किंग सर्कल इथले पाणी ओसरत असून याठिकाणी 1 फुटा पेक्षा कमी पाणी तुंबलं असल्याचंही पालिकेनं म्हटलं आहे. पावसाळ्यापूर्वी 120 ठिकाणी रस्त्यांची आणि इतर कामे हाती घेण्यात आली त्यापैकी अंधेरी कुर्ला रोड, सांताक्रूझ जय भारत कॉलनी, ओबेरॉय मॉल लोखंडवाला सर्कल, श्रीकृष्ण हॉल,  आनंदनगर येथे पाणी तुंबलेच नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. तसेच कोणताही सबवे पाण्याखाली नाही, तसेच नद्यांची पातळी देखील सुरक्षित असल्याचं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. तसेच 298 पैकी 64 ठिकाणी पंप सुरू करण्यात आले असून महापालिकेचे एकूण 3000 पेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी रस्त्यावर असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही उपायुक्त क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS