…तर दुसय्रा पक्षात जाणार शरद पवारांना राष्ट्रवादीच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा इशारा!

…तर दुसय्रा पक्षात जाणार शरद पवारांना राष्ट्रवादीच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा इशारा!

नंदुरबार – विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता पक्ष सोडणार असल्याचं दिसत आहे. नंदुरबारचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांचा मतदारसंघ राष्ट्रवादीला न सुटल्यास आणि तिकीट न मिळाल्यास इतर पक्षात जाण्याचा सुचक इशारा राजेंद्र गावित यांनी दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी शहादा मतदारसंघात राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळीही जर तिकीट मिळालं नाही तर दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच गावित यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र गावित भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने तिकीट दिलं नाही तर गावित भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा 50-50चा फॉर्म्युला ठरला असून 288 पैकी 38 जागा या मित्रपक्षांना तर 125-125 राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देण्यात येणार आहेत. आता जागावाटपावर चर्चा सुरू असताना जिल्ह्यातील चारही मतदारसंघ वाटाघाटीत काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं झालं तर आपण दुसऱ्या पक्षात जाऊ असा सूचक इशारा गावित यांनी दिला आहे.

दरम्यान आज अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले तालुक्यातील भाजापा जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे आणि जिल्हा परीषद सदस्य किरण लहामटेसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोल्यातील मेळाव्यात या नेत्यांचा प्रवेश सोहळा पार पडला आहे. त्यामुळे पिचड पिता पुत्र भाजपात गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं अकोलेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं असल्याचं दिसत आहे.

तर दुसरीकडे साताय्रात काँग्रसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण चव्हाण यांचे समर्थक आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र आणि पुतणे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुतणे सुनील पाटील आणि पुत्र प्रताप पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साताय्रात काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.

COMMENTS