राष्ट्रवादीच्या आमदाराकडून नगरपरिषदेच्या कर निरीक्षकाला मारहाण?

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून नगरपरिषदेच्या कर निरीक्षकाला मारहाण?

परभणी – आमदार नितेश राणे यांनी उप अभियंत्याला मारहाण केलेलं प्रकरण ताजं असतानाच जिंतूरमधील राष्ट्रवादीच्या आमदारानं नगरपरिषदेच्या कर निरीक्षकाला घरी बोलावून मारहाण केली आहे. जिंतूर नगर परिषदेचे कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांना आज आमदार विजय भांबळे यांनी त्यांच्या घरी बोलावले होते. त्यानंतर त्यांनी तुम्ही काम बरोबर का करत नाहीत असे म्हणत वाद घातला. वाद वाढल्यानंतर भांबळे यांनी तळेकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. याप्रकरणी जिंतूरचे राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान यावेळी त्यांच्या घरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, नगराध्यक्ष यांचे पती कपिल फारुकी यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यानंतर कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध मारहाण करणे, शिवीगाळ करणे, शासकीय कामात अडथळा आणणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भांबळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

COMMENTS