शिवसेनेचा मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री होणार, काँग्रेसला हवं आहे ‘हे’ पद ?

शिवसेनेचा मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री होणार, काँग्रेसला हवं आहे ‘हे’ पद ?

मुंबई – भाजपने सत्तास्थापन करण्यास नकार दिल्यानंतर आता राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाहेरुन पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला सत्तेत वाटा मिळणार नसला तरी काँग्रेस पक्षाचा माणूस विधानसभा अध्यक्ष व्हावा यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे माहिती आहे.

दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं मिळून सरकार स्थापन केलं तर भाजपच्या सदस्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता भाजपचा होईल अशी शक्यता आहे. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपमुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सत्तेत समसमान वाटा मिळणार असल्याचीही माहिती आहे.

सत्तास्थापन करण्यास भाजपचा नकार

राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे. भाजपनं राज्यपालांना सत्तास्थापनेविषयीचा आपला निर्णय कळवला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या निर्णयाची माहिती दिली असून विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत या महायुतीला जनतेने भरगोस जनादेश दिला. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो, जनादेश देखील महायुतीला दिला. मात्र, शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही राज्यपालांना सत्तास्थापनेस नकार दिला असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन करायचं असेल, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्यपाल शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा करणार का आणि त्यानंतर शिवसेना सत्तास्थापन करणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

 

COMMENTS