उस्मानाबाद – आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याने अनेकांना खासदार प्रा. गायकवाडांचे दर्शन !

उस्मानाबाद – आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याने अनेकांना खासदार प्रा. गायकवाडांचे दर्शन !

उस्मानाबाद – शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील यांचा सुमारे अडीच लाख मताधिक्यांनी परभाव केला. मात्र जसे प्रा. गायकवाड निवडून आले. तेव्हापासून तब्बल चार वर्षे गायब असल्यासारखेच होते. केंद्र शासनाच्या ज्या योजना असतात, त्या योजनांवर लक्ष ठेवण्यासाठी दिशा समिती असते. त्या समितीचे खासदार हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पाच वर्षात या समितीच्या ११ बैठका झाल्या आहेत.११ पैकी केवळ तीन ते चारच बैठकीला प्रा. गायकवाड हजर आहेत.

उर्वरीत बैठकींना त्यांना हजर राहता आले नाही. त्यांच्या उमरगा येथील निवास्थानीही अनेक शिवसैनिकांना त्यांचे दर्शन होत नव्हते. साहेब आहेत का, असा प्रश्न नागरिकांनी करताच. उत्तर यायचे- साहेब दिल्लीला आहेत. त्यामुळे नागरिकांसह शिवसैनिकांनाही त्यांचे दर्शन दुर्मिळ असायचे. पाच वर्षात भूम तालुक्यातील एकाही गावाला त्यांचे दर्शन झाले नसल्याचे काही कार्यकर्ते बोलतात. बार्शी तालुक्यातही प्रा. गायकवाड म्हणजे दुर्मिळच. सामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारे खासदार कायमच गायब असायचे.

त्यामुळे नागरिकांना त्यांच्या दर्शनाची आतुरता लागलेली असायची. सध्या आदित्य ठाकरे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यात मात्र खासदार प्रा. गायकवाड यांचे दिवसभर दर्शन होत आहे. दरम्यान जशी निवडणूक जवळ येईल, तसे त्यांचे दर्शनही चांगलेच होत असल्याची भावना नागरिक बोलून दाखवित आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे यांनाही खासदारांचे दर्शन घेण्यासाठी उमरगा गाठावे लागले असले तरी ठाकरेंच्या दौऱ्याने खासदारांचे दर्शन झाले हे मात्र सर्वांना समाधानकारक बाब असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.


 

COMMENTS