उस्मानाबाद – तेरणेच्या अर्थकारणाचे राजकारण पेटू लागले !

उस्मानाबाद – तेरणेच्या अर्थकारणाचे राजकारण पेटू लागले !

उस्मानाबाद – राज्यातील  पुढील  वर्षाचा उस गाळपाचा प्रश्न मिटवण्यासाठी बंद पडलेले १० साखर कारखाने सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य रविवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. यामध्ये उस्मानाबादमधील तेरणा कारखाना देखील सुरु केला जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत. हा कारखाना सुरु होणार असल्याचे संकेत मिळताच याच्या अर्थकारणाचे राजकारण आता पेटणार असल्याचं बोललं जात आहे. मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना म्हणून तेरणा साखर कारखान्याची ओळख आहे. हा कारखाना राजकीय आखाड्याचा केंद्रबिंदू असून यावरून जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरत असल्याचा इतिहास आहे. परंतु  बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्यांनी या कारखान्यामध्ये ढवळाढवळ करू नये अशी काही नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तेरणेच्या अर्थकारणाचे राजकारण आतापासूनच जोरात रंगत असल्याचं दिसत आहे.

 

मोठ्याप्रमाणात आर्थिक उलाढाल

तेरणा साखर कारखान्यात भरारी (मद्य निर्मिती) आहे. त्यामुळे यातून मोठ्याप्रमाणात आर्थिक उलाढाल होते. कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीत राजकारणाला आर्थिक बळ यातून मिळते. त्यामुळे तेरणा साखर कारखान्यावर अनेकांचा डोळा आहे. या कारखान्यावर वर्चस्व मिळविल्यानंतर राजकारण, अर्थकारण तसेच समाजकारणही मजबूत होते. त्यामुळे कारखान्याचे राजकारण सध्या जोरात रंगू लागले आहे.

दुस-या जिल्ह्यातील राजकारण्यांचा डोळा

तेरणा साखर कारखाना राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्याच्या राजकीय पुढाऱ्यांनी दंड थोपटले आहेत. कारखाना ताब्यात यावा, यासाठी प्रत्येक राजकीय नेत्याची धडपडत सुरू झाली आहे. बाहेरच्य जिल्ह्यातील उद्योजकांचाही यावर डोळा आहे. तर स्थानिक स्तरावर बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्यांनी यामध्ये ढवळाढवळ करू नये, असे जिल्ह्यातील नेते खासगीत बोलत आहेत. त्यामुळे आता तेरणेचे राजकारण अर्थकारणावरून कसे रंगते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेतक-यांची आर्थिक कोंडी सुटणार

तेरणा साखर कारखान्याची 10 हजार मे.टन गाळप क्षमता आहे. त्यामुळे परिसरातील पाच ते सहा साखर कारखान्यावर तेरणेच्या गाळपाचा परिणाम होतो. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सोडविली जाते. अन्यथ अन्य साखर कारखानदार मनमानी करतात. त्यामुळे तेरणा सुरू झाला तर शेतकऱ्यांनाही चार पैसे पदरात पडण्याची आशा आहे.

 

COMMENTS