पत्रकार संभाजी मुंडे हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडेंचे परळी पोलिसांना निर्देश !

पत्रकार संभाजी मुंडे हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडेंचे परळी पोलिसांना निर्देश !

बीड, परळी – परळी वैजनाथ येथील पत्रकार संभाजी मुंडे हल्ला प्रकरणातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलीसांना दिले आहेत. परळी शहरात काल घडलेल्या या हल्ल्याच्या घटनेची धनंजय मुंडे यांनी तातडीने माहिती घेऊन हा हल्ला कोणत्याही कारणावरून झाला असला आणि आरोपी कोणीही असले तरी त्यांचा मुलाहिजा न बाळगता त्यांना तातडीने अटक करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे निर्देश दिले आहेत . शहरात कोणत्याही प्रकारची आणि कोणाचीही गुंडगिरी चालू केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान वृत्तवाहिनीसाठी काम करणारे वार्ताहर संभाजी मुंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. आज (दि.११ मे) रोजी रात्री ८ च्या सुमारास सदरील घटना घडली. या घटनेत संभाजी मुंडे यांच्यासह मुलगा विष्णू आणि त्यांच्या पत्नी जखमी झाले आहेत.७ ते ८ जणांनी सशस्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात संभाजी मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय जखमी झाले आहेत. परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. प्राणघातक हल्ल्याच्या मागील सूत्रधार कोण? याची माहिती पोलीस घेत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मागील दोन महिन्यांत परळीत पत्रकारांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 21 मार्च रोजी धर्मापुरी रोडवरील स्थानिक सिमेंट कंपनीमध्ये करोनाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी काही स्थानिक पत्रकार गेले होते. कोरोनाविषयी काय काळजी घेत आहात, मास्क का नाही लावला? असे प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? असा सवाल विचारत अज्ञात व्यक्तींनी पत्रकारांवर हल्ला केला होता. या घटनेत दत्तात्रय काळे आणि महादेव शिंदे हे जखमी झाले होते.

COMMENTS