भीमा कोरेगाव प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याबाबत हालचाली,  शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत काँग्रेसची मागणी !

भीमा कोरेगाव प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याबाबत हालचाली, शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत काँग्रेसची मागणी !

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. भीमा कोरेगावच्या मुद्द्यावर चर्चेसाठी पवारांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना बोलावले होते
मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, तर काँग्रेसकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव अमिताभ गुप्ताही उपस्थित होते.

या बैठकीनंतर भीमा कोरेगाव प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. शरद पवार यांनी आधीच भीमा कोरेगाव प्रकरणात एसआयटी चौकशीची आग्रही भूमिका घेतली होती. एक आठवड्याच्या आत याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख आणि नितीन राऊत चर्चा करतील आणि पुढची भूमिका ठरवतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी पूर्वी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती.त्यानुसार आता भीमा कोरेगाव प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

COMMENTS