विधानसभा निवडणूक – पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या नेत्याला उमेदवारी ?

विधानसभा निवडणूक – पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या नेत्याला उमेदवारी ?

पुणे – लोकसभा निवडणुकीचा निकाल अजून बाकी आहे. परंतु आतापासूनच विधानसभा निवडणुकीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कोणता उमेदवार कोठून लढणार याबाबतची चाचपणीही पक्षांकडून केली जात आहे. पिंपरी-चिंचवड मतदारसंघातही विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगली असल्याचं दिसत आहे. सलग दोन वेळा निवडणूक जिंकणारे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून कोण लढणार याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीला अवघे तीन-साडेतीन महिने बाकी आहेत. मागच्या निवडणुकीत जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीने नवखे असलेले नगरसेवक नाना काटे यांना उमेदवारी दिली होती. गेल्या निवडणुकीत शिवसेनाही स्वतंत्र लढली. शिवसेनेने राहुल कलाटे यांना मैदानात उतरवले होते. काँग्रेसने कैलास कदम यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत सर्वांना धोबीपछाड देत आमदार जगताप हे तब्बल ६० हजाराहून अधिक मताधिक्क्याने निवडून आले.

तसेच आमदार जगताप हे चिंचवड मतदारसंघातील ताकदीचे उमेदवार असल्याने त्यांच्या विरोधात उमेदवार कोण कोण असतील, याबाबत आतापासूनच अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. विशेषतः राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला दिली जाणार याबाबत उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादीकडून चिंचवड मतदारसंघात लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, मयूर कलाटे या नावांची चर्चा आहे. एवढेच नाही, तर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे हे देखील राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS