राहुल गांधींचे कर्नाटकात ‘गुजरात कार्ड’ !

राहुल गांधींचे कर्नाटकात ‘गुजरात कार्ड’ !

कर्नाटक – कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकंडूनजोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही सध्या चार दिवसीय कर्नाटकच्या दौ-यावर आहेत. परंतु कर्नाटकमध्येही राहुल गांधीचं गुजरात कार्ड दिसून येत आहे. कारण गुजरातप्रमाणेच त्यांनी कर्नाटकमध्येही मंदिरांमध्ये जाऊन पूजाअर्चा करण्याचा सपाटा धरला आहे. कर्नाटकमधील अभियानाची सुरुवातच त्यांनी कोप्पल येथील प्रसिद्ध हुलीगेम्मा मंदिराला भेट देऊन केली आहे. त्यांनी कोप्पलमधील महापालिकेच्या मैदानात व त्यानंतर कुकानूरमधील विद्यानंद महाविद्यालयाच्या मैदानावर सभा घेतली आहे. त्यानंतर त्यांनी लिंगायत समाच्या सिध्देश्वर मठालाही भेट दिली आहे. आज ते गुलबर्गा येथील प्रसिद्ध ख्वाजा बंदे नवाज दरगाह येथे भेट देणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यांच्या दौऱ्याचा शेवट बीदर येथे होणार असून तेथे ते १२ व्या शतकातील समाजसुधारक बसवेश्वर यांनी स्थापन केलेल्या बसवा कल्याण येथील अनुभावा मंतपाला भेट देणार आहेत.

दरम्यान कर्नाटमध्ये काँग्रेसच पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास त्यावेळी राहुल गांधी यांनी वर्तवला आहे. यापुढेही काँग्रेसच राज्यात सत्ता स्थापन करणार असून कर्नाटकातील गरीबांच्या हिताचे मोठे निर्णय घेणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यातील शेतक-यांसाठी विविध चांगल्या योजना राबवल्या जाणार असल्याचं वचन त्यांनी कर्नाटकमधील जनतेला दिलं आहे.

राहुल गांधींनी गुजरात निवडणुकीदरम्यान प्रसिद्ध सोमनाथ मंदिरासाह इतर मंदिरांना भेट देऊन पूजा अर्चा केली होती. त्यानंतर कर्नाटकमध्येही राहुल गांधींचं गुजरात कार्ड पहावयास मिळत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये सत्ता मिळाली नसली तरी राहुल गांधींच्या काँग्रेसनं भाजपला चांगलीच टक्कर दिली होती. याच धारणेनं राहुल गांधींचं कर्नाटकमध्येही देवदर्शन सुरुच आहे. त्यामुळे कर्नाटमध्येही आपल्यालाच यश मिळणार असून याठिकाणी काँग्रेसच सत्ता स्थापन करणार असल्याची धारणा राहुल गांधींची आहे.

COMMENTS