रायगडमध्ये पुन्हा गीते विरुद्ध तटकरे सामना रंगणार, तटकरेंनी गीतेंचे आव्हान स्वीकारले !

रायगडमध्ये पुन्हा गीते विरुद्ध तटकरे सामना रंगणार, तटकरेंनी गीतेंचे आव्हान स्वीकारले !

रायगड – मागील निवडणूकीत मोदी लाट असूनही जेमतेम 2 हजार मतांनी पराभूत झालेले सुनील तटकरे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का हा प्रश्‍न आता संपुष्‍टात आला आहे. महाआघाडीतर्फे सुनील तटकरे हेच लोकसभेचे उमेदवार असतील असे आज शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. खुदद सुनील तटकरे यांनीही याला दुजोरा दिला असून आपण कामाला लागलो असल्‍याचे स्‍पष्‍ट केलं आहे. त्‍यामुळे आता सुनील तटकरे विरूदध अनंत गीते असा सामना रायगडकरांना पुन्‍हा पहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे सुनील तटकरे हे विधानपरीषदेची निवडणूक लढवणार नसल्‍याचेही यानिमित्‍ताने  स्‍पष्‍ट झाले असून शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा पुन्‍हा विधानपरीषदेचा मार्ग सुकर झाला आहे.

सुनील तटकरे यांची विधान परिषदेची मुदत जुलै महिन्यात संपत आहे. सुनील तटकरे पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढविणार अशी चर्चा होती. सुनील तटकरे हे आमचे लोकसभेचे उमेदवार असतील त्यांना आम्ही निवडून आणणार असे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी  मेळाव्यातील भाषणात जाहीर केले. कोकण पदवीधर मतदार संघातील आघाडीचे उमेदवार नजीब मुल्‍ला यांच्‍या प्रचारार्थ आज अलिबाग येथे हा मेळावा आयोजीत करण्‍यात आला होता.

सुनील तटकरे माझ्या विरोधात निवडणूक लढविण्याचे धाडस करणारच नाहीत. त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवूनच दाखवावी असे आव्हान केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते वारंवार देत असतात.त्यामुळे गीते यांचे आव्हान तटकरे यांनी स्वीकारल्याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

दरम्यान सुनील तटकरे हे विधान परिषद निवडणूक लढवणार नसल्यामुळे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा विधान परिषदेत निवडून जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे. आमदार जयंत पाटील यांच्या  विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत जुलै महिन्यात संपत आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना  काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा कोठ्यातील  मतं मिळू शकणार आहेत.

दरम्यान मागील 2014 च्‍या लोकसभा निवडणूकीत शिवसेना-भाजपा युतीचे अनंत गीते, राष्‍ट्रवादी – काँग्रेस आघाडीचे सुनील तटकरे व शेकापचे रमेश कदम अशी तिरंगी लढत झाली होती. राज्‍यभरात युतीचे उमेदवार लाखापेक्षा अधिक मतांच्‍या फरकाने निवडून येत असताना अनंत गीते अवघ्‍या 2 हजार मतांनी विजयी झाले होते. अनंत गीते यांनी यापूर्वीच आपण पुन्‍हा लोकसभेची निवडणूक लढवणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले होते. यावेळी शेकापचा तटकरे यांना पाठींबा आहे, त्‍यामुळे पुन्‍हा एकदा गीते विरुद्ध तटकरे असा रंगतदार सामना रायगडकरांना अनुभवायास मिळणार असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS