देशात सध्या आणीबाणीची परिस्थिती – राज ठाकरे

देशात सध्या आणीबाणीची परिस्थिती – राज ठाकरे

मुंबई –  गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवरील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. सगळेच प्रश्न संपल्यामुळे आमचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री गाणी गात आहेत. हे काम आहे का मुख्यमंत्र्यांचं, अर्थमंत्र्यांचं? हे जर इतर कोणी केलं असतं तर माध्यमांनी किती टीका केली असती? अशी टीका राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. तर देशात सध्या आणीबाणीची परिस्थिती असून देशाला १९४७ साली पहिले स्वातंत्र्य मिळाले. १९७७ला आणीबाणीत दुसरे स्वातंत्र्य मिळाले. आता, २०१९ साली तिसरे स्वातंत्र्य मिळायला हवे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी जितकी दाखवली पण जस्टीस लोयांच्या मृत्यूची बातमी का नाही दाखवली गेली असा सवालही राज यांनी केला आहे. तसेच निरव मोदी प्रकरण विसरावं म्हणून श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी इतकी चघळली. श्रीदेवी असतील मोठ्या अभिनेत्री पण प्रश्न पडतो की त्यांनी असं काय महान काम केलं की त्यांचा पार्थिव देह तिरंग्यात गुंडाळला. नंतर बातमी आली की त्या दारू पिऊन गेल्या. मग अशा माणसाला तुम्ही असा सन्मान देता कशाला अशी जोरदार टीकाही राज ठाकरेंनी यावेळी केली आहे.

तसेच जस्टीस लोयांच्या मृत्यूची केस एका महिला न्यायाधीशाकडे होती, त्या निस्पृह होत्या म्हणून त्यांच्याकडून केस काढून घेतली असं वाटू नये म्हणून महाराष्ट्रात १०० न्यायाधीशांची बदली केली. सुप्रीम कोर्टातील त्या ४ न्यायाधीशांनी पण तेच सांगितलं की आमच्यावर दबाव आहे. तुम्ही जर हिटलर आणि त्याच्या प्रचारावरची पुस्तकं नीट वाचलीत तर तुमच्या लक्षात येईल की सध्या अमित शहा आणि मोदी त्याच पद्धतींचा वापर करत असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे.

मेट्रोच्या विरोधात कोणत्याही बातम्या द्यायच्या नाहीत ते सक्त आदेश आहेत असं मला काही पत्रकारांनी सांगितलं. नितीन गडकरी साबणाच्या फुग्यासारखे घोषणांचे आकडे उडवत फिरत असतात अशी टीकाही त्यांनी गडकरींवर केली आहे. तसेच पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा हे अक्षय कुमारचे सिनेमे हे केंद्रशासित पुरस्कृत आहेत. अक्षय कुमार सध्या आधुनिक मनोज कुमारांच्या भूमिकेत आहेत. आणि आपल्याला देशभक्ती शिकवणारे अक्षय कुमार कॅनडाचे नागरिक आहेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS