सालकरी निवडायचा की मालक ते तुम्हीच ठरवा, राम शिंदेंचं जनतेला भावनिक आवाहन!

सालकरी निवडायचा की मालक ते तुम्हीच ठरवा, राम शिंदेंचं जनतेला भावनिक आवाहन!

अहमदनगर – आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार आणि भाजपचे मंत्री राम शिंदे यांची लढत जवळपास निश्चित झाली आहे. दोघांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत. अशातच राम शिंदे यांनी कर्जत जामखेडकरांना भावनिक आवाहन केलं आहे. सालकऱ्याचा मुलगा सालकरी राहतो. मात्र मालकाचा मुलगा मालकच राहतो. त्यामुळे कर्जत जामखेडच्या जनतेने सालकरी निवडायचा की मालक निवडायचं हे ठरवावं, असं भावनिक आवाहन मंत्री राम शिंदे यांनी केलं आहे.

तसेच तालुका पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम याच लोकांनी केले. आज मात्र निवडणुकीच्या तोंडावर जनतेची कुचंबणा करण्याचे काम या लोकांकडून केलं जात असल्याची टीकाही राम शिंदे यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. आज भाजपतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलं होतं. त्यावेळी राम शिंदे बोलत होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच राहीत पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका केली होती. गेली दहा वर्षे लोकप्रतिनिधी असलेले राम शिंदे हे सध्या गावागावात विकास केल्याचे बॅनर लावत आहेत. पण केलेली कामं नागरिकांना दिसत नाहीत. गावात विकास केल्याचे त्यांना बॅनर लावून सांगण्याची वेळ आली असल्याने जमखेडचे लोकप्रतिनिधी हे बॅनर मंत्री असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यानंतर आज राम शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

COMMENTS