“शरद पवारांनी आदेश दिल्यास वयाच्या 92 व्या वर्षीही रावसाहेब दानवेंविरोधात लढतो !”

“शरद पवारांनी आदेश दिल्यास वयाच्या 92 व्या वर्षीही रावसाहेब दानवेंविरोधात लढतो !”

जालना – माझं वय 92 वर्ष असलं म्हणून काय झालं..? शरद पवारांनी आदेश दिल्यास जालना लोकसभेतून रावसाहेब दानवे विरोधात लढणार असल्याचं वक्तव्य माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांनी केलं आहे. गुरू-शिष्याची नाही तर ही राम रावणाची लढाई होईल,रावसाहेब दानवेंना शिष्य म्हणायची लाज वाटते, जशी लाज विभीषणाला रावणाची वाटत होती, संसदेच्या इमारतीला पिल्लर किती या प्रश्नाचं उत्तर रावसाहेब दानवेंनी दिल्यास त्यांच्या विरोधात काम करणं सोडून देईल असंही पुंडलीकराव दानवे यांनी म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुंडलीकराव दानवे यांनी वक्तव्य केलं आहे.

पुंडलिकराव दानवे यांची राजकीय कारकिर्द

दरम्यान पुंडलिकराव दानवे हे जालन्यातील ज्येष्ठ नेते आहेत. पुंडलिकराव हे १९७७ मध्ये जनता दलाकडून जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपकडून लोकसभेच्या चार निवडणुका लढविल्या आणि त्यापैकी एकदाच निवडून येऊ शकले. १९९० पर्यंत जालना जिल्ह्य़ात भाजपचे सर्वोच्च नेते म्हणून पुंडलिकरावांचेच नाव होते. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत दीड हजाराच्या आसपास मतांनी रावसाहेब दानवे पराभूत झाले परंतु तेव्हापासून जिल्ह्य़ाच्या राजकारणात त्यांची ओळख निर्माण झाली. पुढे १९९० मध्ये रावसाहेब विधानसभेवर निवडून आले आणि भाजपमध्ये पुंडलिकराव मागे पडत गेले.

१९९५ मध्ये रावसाहेब विधानसभेवर निवडून आले. त्यांच्यात आणि पुंडलिकरावांमधील अंतर बरेच वाढले होते. सलग पाच वेळा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या पुंडलिकरावांना भाजपने उमेदवारी नाकारली आणि तेव्हापासून त्यांच्यात व रावसाहेबांमध्ये कायमचे अंतर पडले. १९९७ मध्ये पुंडलिकरावांचे चिरंजीव चंद्रकांत दानवे यांना भाजपने जिल्हा परिषद अध्यक्षाची उमेदवारी नाकारली होती आणि २००७ मध्ये तर त्यांना जिल्हा परिषद सदस्यत्वाची उमेदवारीही दिली नव्हती. भोकरदन विधानसभेच्या २००३ मधील पोटनिवडणुकीत पुंडलिकरावांनी आपल्या मुलास राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आणि त्यास भाजपच्या विरोधात निवडून आणले. पुढील दोन विधानसभा निवडणुकांमध्येही चंद्रकांत दानवे निवडून आले. तेंव्हापासून पुंडलिकराव दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्या 36चा आकडा आहे.

त्यामुळे त्यांनी आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रावसाहेब दानवे यांना थेट आव्हान दिलं आहे. पवारांनी उमेदवारी दिली तर वयाच्या 92 व्या वर्षीही लोकसभा निवडणूक लढवतो असं पुंडलिकराव दानवे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS