ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवारांनी भरला दम

ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवारांनी भरला दम

अहमदनगर: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावांना बक्षीस म्हणून निधी देण्याच्या योजनेत कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही उडी घेतली आहे. निवडणुकीत दडपशाही आणि दमबाजी करणाऱ्यांनाही त्यांनी तंबी दिली आहे. कोणी असे प्रकार केले तर गाठ माझ्याशी आहे, सज्जड इशाराच पवार यांनी दिला आहे.

ग्रामपंचायतींची निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या अंतिम मुदत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठिकठिकाणच्या आमदारांनी पुढाकार घेतल्याने अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध होत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दोनच दिवस बाकी असताना पवार यांनी बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावांना आमदार निधीतून, सीएसआर फंडातून ३० लाखांचा विकास निधी देण्याची घोषणा पवार यांनी केली आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार आणि भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस आहे. बहुतांश गावांत अशाच चुरशीने निवडणुका लढविल्या जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणी स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य काही मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गय केली जाणार नाही. असा कोणताही प्रकार कोणी करू नये. अन्यथा,लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशाराच पवार यांनी दिला आहे.

COMMENTS