राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मा. गो. वैद्य यांचे निधन

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मा. गो. वैद्य यांचे निधन

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मा. गो. वैद्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुनंदा, तीन मुली, पाच मुलं असं कुटुंब आहे. मा.गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता निघणार आहे. अंबाझरी घाट या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मा.गो. वैद्य हे संस्कृतचे व्यासंगी विद्वान होते. वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी १९२३ मध्ये जन्मलेले वैद्य कॉलेज जीवनापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना १९४३ मध्ये मा.गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक झाले. १९४८ मध्ये गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी वैद्य हे भूमिगत राहून काम करत होते. हिस्लॉप कॉलेजमध्ये अध्यापन करत असताना मा. गो. वैद्य यांनी संघाशी असलेली निष्ठा उघडपणे दाखवली होती. १९५४-५५ मध्ये प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये, असे करार विद्यार्थ्यांकडून करून घेतले होते. तेव्हा त्यास वैद्य यांनी नकार दिला होता. नंतर मा. गो. वैद्यांनी हिस्लॉप कॉलेज सोडले होते. पुढे वैद्य यांनी पत्रकारितेत पाऊल ठेवले. आणीबाणीत सेन्सॉरशिप लागू झाल्यावर त्यांनी संपादक म्हणून लिहिलेले अग्रलेख गाजले होते. १९७८ मध्ये मा. गो. वैद्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, अखिल भारतीय प्रचार प्रमुख, अखिल भारतीय प्रवक्ता म्हणून जबाबदारी पार पाडली. संघ परिवारात सर्वांसाठी ते आदरणीय होते. हिंदुत्वावर त्यांचं विपुल साहित्य प्रकाशित झालेलं असून त्यांना अनेक पुरस्कांनीही सन्मानित करण्यात आले होते. तसेच विधान परिषदेमध्येही त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. तसेच ते पत्रकारिता सुरु केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारं सुगम संघ नावाचं हिंदी पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं.

मा. गो. वैद्य यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण केली. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, जेष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते.” असं म्हणत नितीन गडकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

COMMENTS