राम मंदिराचा निर्णय घेणं पंतप्रधान मोदींना अवघड नाही – संजय राऊत

राम मंदिराचा निर्णय घेणं पंतप्रधान मोदींना अवघड नाही – संजय राऊत

अयोध्या  नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान मोदींनी  अवघ्या काही तासांमध्ये घेतला. त्यामुळे राम मंदिराचा निर्णय घेणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीही अवघड नसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचं देशात फिरणं अवघड करू असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे. ते अयोध्येत पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणलं तर राम मंदिर बांधणं काही अवघड नाही. भाजपने संसदेत कायदा करावा त्याला शिवसेना तर पाठिंबा देईलच त्याचबरोबर अन्य पक्षांचे खासदारही पाठिंबा देतील. तसेच उत्तरप्रदेश आणि केंद्रातही भाजपचच सरकार आहे त्यामुळं असा कायदा करणं अवघड नाही. भाजप असं का करत नाही ते माहित नाही असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे. बाबरी ढाचा शिवसेनेने पाडला त्यामुळं मंदिर बांधणं आम्हाला अवघड नसल्याचंही राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते अयोध्येत दाखल झाले आहेत.

COMMENTS