साताय्रात राष्ट्रवादीला दुसरा धक्का, ‘हा’ बडा नेता शिवसेनेत जाणार?

साताय्रात राष्ट्रवादीला दुसरा धक्का, ‘हा’ बडा नेता शिवसेनेत जाणार?

सातारा – साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. उदयनराजे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती आहे. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला रामराजे यांच्या रुपाने साताय्रात दुसरा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. रामराजे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यादरम्यान ते आपल्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करतील असं बोललं जात आहे.

दरम्यान उदयनराजे भोसले आज आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी उदयनराजे आज संध्याकाळी दिल्लीत दाखल होणार आहेत. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे यांचा उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यानंतर आता रामराजेही शिवसेनेत जातील असं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला साताय्रात मोठ खिंडार पडणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS