‘सबका साथ सबका विकास’ ही संकल्पना स्व. गोपीनाथराव मुंडेंची – शहानवाज हुसेन

‘सबका साथ सबका विकास’ ही संकल्पना स्व. गोपीनाथराव मुंडेंची – शहानवाज हुसेन

केज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. देशाच्या संरक्षण, आर्थिक, सामाजिक समृद्धीसह देशातील प्रत्येक नागरिकाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. गरीब आजारी व्यक्तींना पाच लाखांची मदत, घरोघरी गॅस सिलेंडर, १६ लाख लोकांना मुद्रा लोन आदी माध्यमातून प्रत्येकाचे जीवनमान उंचावून ‘सबका साथ सबका विकास’ या सूत्रावर देशाची सरकार सुरु आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या संकल्पनेचे जनक स्व. गोपीनाथराव मुंडे हे आहेत. २० वर्षापूर्वीच त्यांनी ही संकल्पना आपल्या कर्मभूमीत राबविली. त्यामुळेच मुंडे साहेब हे जाती, धर्म, पक्ष या पलीकडचे नेतृत्व होते, सच्चा ‘लोकनेता’ होते. सर्व धर्मीयांना त्यांच्याबद्दल विश्वास होता, आपुलकी होती. मुस्लीम समाजातूनही त्यांना ८० ते ९० टक्के लोकांचा पाठींबा कायम होता. आज काही लोक भाजपची भीती घालून मुस्लीम समाजाची मते मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु या भूमीत मुंडे साहेबांनी धर्मनिरपेक्ष विचार पेरले आहेत, जोपासले आहेत. त्यामुळेच आजही इथला ८० टक्के समाज मुंडे साहेबांचा वारसा चालविणाऱ्या लेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते तथा माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन यांनी केज येथील भव्य सभेला संबोधित करताना केले.

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी दुपारी केज येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अभूतपूर्व जनसागर लोटला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या बालेकिल्ल्यातच सभेच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक करून प्रीतमताईंनी बाजी मारली. या सभेने केज मतदार संघासहीत संपूर्ण बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असून सर्व जातीधर्मातील लोक मुंडे भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. आ. संगीता ठोंबरे, आ. जयदत्त क्षीरसागर, रमेश आडसकर, डाॅ. भागवत कराड, केशवराव आंधळे, विक्रमबप्पा मुंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, संतोष हंगे, कल्याण आखाडे, रमाकांत मुंडे, हारूण इनामदार, संदीप पाटील, योगिनी थोरात, दिलीप करपे, रत्नाकर शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना शहानवाज हुसेन म्हणाले की, भ्रष्टाचारात अखंड बुडालेले कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर उतरून टीका करत आहेत. परंतु, देशाचा चौकीदार ‘चौकन्ना’ आहे. या भ्रष्ट लोकांवर आणि त्यांनी केलेल्या अपहारांवर त्यांची करडी नजर आहे. घोटाळे उघडकीस येऊन तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळेच हे लोक पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत असल्याचे हुसेन म्हणाले. त्यामुळे मोदी यांना भक्कम पाठींबा देण्यासाठी डॉ. प्रीतम मुंडे यांना पूर्वीच्या पेक्षाही अधिक मते देऊन संसदेत पाठवा. आजपर्यंत त्यांनी संसदेत पाठपुरावा करून तुमचे अनेक प्रश्न सोडविले. विकास कामांसाठी कोट्यावधींचा निधी आणला. जिल्ह्याच्या विकासाची प्रक्रिया निरंतर सुरु ठेवण्यासाठी प्रीतम मुंडे यांना पुन्हा निवडून द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

माझ्या सहीने ऊसतोड महामंडळ रद्द होणार, ही अफवा – पंकजा मुंडे
—————————–
माझ्या सहीने ऊसतोड महामंडळ रद्द होणार अशी अफवा विरोधक पसरवित आहेत. धनंजय मुंडे, अशा थापा मारणे बंद करा. ऊसतोड महामंडळ झाले असून त्यासाठी शंभर कोटी रुपये देखील मंजूर झाले आहेत. सध्या ऊसतोड कामगारांची अधिकृत ऑनलाईन यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. नंतर त्या यादीनुसार सर्वाना ओळखपत्रे देण्यात येतील. ओळखपत्रांवर त्यांना ऊसतोड कामगारांसाठीच्या सर्व योजना मिळणार आहेत. आरोग्य, शिक्षण, शिष्यवृत्ती हे सर्व मिळणार आहे. आता ऊसतोड कामगारांची मुलेही दर्जेदार शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर होतील, त्यासाठी मी त्यांच्या पाठीशी उभी आहे. एवढेच नाही तर या कामगारांना बैलजोडी देण्यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत मी दोन वेळा लवादात ऊसतोड कामगारांना मानधनवाढ, मजुरीत वाढ मिळवून दिली असल्याचे ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. ‘विकासआंधळे’ झालेल्या बुद्धीभ्रष्टवादीच्या लोकांना चांगले काहीच दिसत नाही, त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करतात. आम्ही २५ वर्षेत टिकणारे रस्ते दिले, योजना दिल्या. पुढच्या कित्येक पिढ्यांच्या कल्याणसाठी रेल्वे दिली. राष्ट्रवादीच्या लोकांनी आजवर तुम्हाला खड्डेयुक्त रस्त्यांशिवाय काहीच दिले नाही. बोगस कामांद्वारे सर्व योजना लाटल्या. जिल्हा भकास केला. पण आम्ही जिल्ह्याला प्रयत्नपूर्वक पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर आणले. वेगात आलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी आणि नवीन योजनांचच्या साह्याने जिल्ह्याच्या विकासाला पाठबळ देण्यासाठी उच्चशिक्षित आणि तेवढ्याच संवेदनशील असलेल्या डॉ. प्रीतमताईंना पुन्हा एकदा संसदेत पाठवा असे आवाहन पंकजाताईंनी जनतेला केले. आता शेवटच्या दिवसात हे लोक तुमच्या इमानाला हात लावायला येतील. पण, कोणत्याही भूलथापांना आणि अमिषाला बळी न पडता विकासाची कास धरा असेही आवाहन त्यांनी केले.

गोपीनाथगडावर जाण्याची स्वतःहून व्यक्त केली इच्छा
————————
शहानवाज हुसेन आणि स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या मित्रत्वाचे संबंध होते. हुसेन मुंडे साहेबांना मोठा भाऊ मानत. त्यामुळे आज बीडमध्ये येताच हुसेन यांनी स्वतःहून गोपीनाथ गडावर जाण्याची इच्छा व्यक्त केली. समाधीचे दर्शन घेतल्यानंतर हुसेन भाऊक झाले होते. गोपीनाथ गडावर उमललेल्या कमळाच्या पार्श्वभूमीवर साक्षात मुंडे साहेब समोर उभे असल्याचा भास झाल्याचे भावनिक विधान त्यांनी केले. हेलिकॉप्टर आणि कारमधील प्रवासातही ते पूर्णवेळ पंकजाताईंना मुंडे साहेबांच्या आठवणी सांगत होते. अतिशय भाऊक झाल्याने नेहमीच्या त्वेषाने भाषण करू शकत नसल्याचे नंतर हुसेन म्हणाले.

COMMENTS