भाजपचा ‘तो’ प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळला !

भाजपचा ‘तो’ प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळला !

पालघर – पालघर पोटनिवडणुकीसाठी भाजपनं दिलेला प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळला असून या निवडणुकीतून माघार न घेण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवा, त्यांचं आम्ही पुनर्वसन करु. श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी किंवा विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, असा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेसमोर ठेवला होता. परंतु भाजपचा हा प्रस्ताव शिवसेनेनं अखेर फेटाळला असून या निवडणुकीबाबत शिवसेनेनं आपली भूमिका कायम ठेवली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान पालघर पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत आहे. त्यामुळे भाजपनं ठेवलेला प्रस्ताव स्वीकारुन शिवसेना आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलं होतं. परंतु शिवसेनेनं भाजपचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना निवडणूक लढवणार असल्यामुळे आता शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी या पक्षांमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

दरम्यान भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आतापर्यंत नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यापैकी किती जण मागे घेतात, यावर या निवडणुकीतील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS