उसतोड कामगारांचा संप यशस्वी,  मजूरीत झाली पाच टक्के उत्तेजनार्थ वाढ !

उसतोड कामगारांचा संप यशस्वी, मजूरीत झाली पाच टक्के उत्तेजनार्थ वाढ !

मुंबई – राज्यातील ऊसतोड कामगारांनी सुरू केलेल्या संपाला अखेर यश मिळाले आहे. ऊसतोडणी मजूरांच्या मजूरीत पांच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे व आमदार जयंत पाटील यांच्या लवादाने घेतला आहे. दरम्यान, या निर्णयाचे स्वागत करत ऊसतोडणी मजूर संघटनेचे नेते माजी आमदार केशवराव आंधळे व गोरक्ष रसाळ यांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.

राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक संघटनांनी ऊसतोड मजूरांच्या दरात वाढ करावी या व इतर मागण्या त्यांनी केल्या होत्या, यासाठी त्यांनी गेल्या कांही दिवसांपासून संपही पुकारला होता. ऊसतोड मजूरांच्या बाजूने ना. पंकजाताई मुंडे व कारखानदारांच्या वतीने आमदार जयंत पाटील यांच्यात असलेल्या लवादाला संपावर तोडगा काढून निर्णय घेण्याचे अधिकार  ऊसतोड मजूर संघटनेने २२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार २२ ऑक्टोबर रोजी लवादाची बैठक पार पडली यात, संपक-यांची मागणी व साखर उद्योगाच्या अडचणी संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेवून अंतिम निर्णय घ्यावा असे ठरल्यानंतर बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्यास ना. पंकजाताई मुंडे, आ. जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील व आ. बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

मजूरीत पांच टक्के वाढ 

सध्या अस्तित्वात असलेल्या सामंजस्य करारातील ऊसतोडणी दरामध्ये दिलेल्या २० टक्के वाढीमध्ये ५ टक्के उत्तेजनार्थ वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सध्या असलेल्या   प्रतिटन २२८ रू. १९ पैसे मजूरी  ऐवजी आता मजूरांना प्रतिटन २३९ रू. ६० असा वाढीव दर मिळणार आहे. गाडी सेंटर २५४ रू. ६२ पै. वरून २६७ रू.३५ पै. टायर गाडी तोडणी १९८ रू. ३८ पै. वरून २०८ रू.३० पै. तर पहिल्या किमीसाठी ८४ .७२ रू.वरून ८८.९६ रू. आणि पुढील प्रत्येक किमीसाठी १२.३६ रू. वरून १२.९८ रू. अशी वाढ करण्यात आली आहे. सदरची वाढ सामजंस्य करारातील हंगाम २०१८-१९ व २०१९-२० या हंगाम कालावधीकरिता ग्राहय राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी सर्व साखर कारखान्यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.

पंकजा मुंडे यांच्यामुळे मजूरांना न्याय  – आंधळे, रसाळ

ऊसतोड कामगारांचा संप यशस्वी झाल्याबद्दल प्रतिक्रिया देतांना ऊसतोड मजूर संघटनेचे नेते माजी आमदार केशवराव आंधळे व गोरक्ष रसाळ यांनी  यापूर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब लवादात असताना सन २०१० मध्ये असाच संप केला होता, त्यावेळी १९ टक्के वाढ होवून चार टक्के उत्तेजनार्थ वाढ झाली होती आता ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे २० टक्के वाढ होवून पांच टक्के वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले की, ना. पंकजाताई हया मंत्री व कारखानदार असूनही मजूरांना न्याय मिळवून देण्यासाठी संपात सहभागी झाल्या, लवादाची अनेक वेळा बैठक घेतली एवढेच नव्हे तर शरद पवारांसोबत बैठक घेवून त्यांना यासाठी राजी केले. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते मुंडे साहेबांच्या नांवाने १०० कोटीची सरकारी योजना त्यांनी मंजूर करून घेवून त्यासाठी वीस कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही केली. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविताना त्या कुठेही कमी पडल्या नाहीत, त्यांच्या हिताचाच विचार त्या सातत्याने करत असतात, असे सांगून आंधळे व रसाळ यांनी ऊसतोड मजूरांच्या दरवाढीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS