सोलापूरचं पालकमंत्रीपद जितेंद्र आव्हाडांकडे, दिलीप वळसे पाटील यांची उचलबांगडी !

सोलापूरचं पालकमंत्रीपद जितेंद्र आव्हाडांकडे, दिलीप वळसे पाटील यांची उचलबांगडी !

मुंबई – सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री होते. परंतु वळसे पाटील यांची या पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

दरम्यान दिलीप वळसे पाटील पालकमंत्रिपदाबाबत फार इच्छुक नव्हते. पालकमंत्री झाल्यापासून केवळ दोनदा त्यांनी जिल्हा दौरा केला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात सोलापूर जिल्हावासियांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या. यानंतर आज अखेर आव्हाडांकडे सोलापूरची जबाबदारी देण्यात आली आहे.

केवळ महिन्याचा नको, माझा वर्षाचा पगार घ्या – आव्हाड

दरम्यान कोरोनामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व आर्थिक परिस्थिती धोक्यात आल्यामुळे राज्य शासन लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करणार आहे. यावर आपल्याला एका महिन्याचे वेतन न देता या वर्षीचा संपूर्ण पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांच्या पगारात तब्बल 40 टक्क्यांची कपात होणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयानुसार ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सरकारी अधिकाऱ्यांना निम्मेच वेतन (50 टक्के कपात) दिले जाणार आहे. ‘क’ वर्ग कर्मचाऱ्यांच्या वेतनात 25 टक्क्यांची कपात होणार आहे. ‘ड’ वर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात मात्र, कपात करण्यात आली नाही.

COMMENTS