माजी मंत्री सुबोध सावजींचं विहिरीत बसून आंदोलन !

माजी मंत्री सुबोध सावजींचं विहिरीत बसून आंदोलन !

बुलडाणा – माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी विहिरीत बसून अनोख्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. जिह्यातील नळपाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याविरोधात त्यांनी नळयोजनेच्या विहिरीत ठिय्या मांडून या अधिका-यांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सुबोध सावजी हे जिल्हा शासकीय नळपाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य व अध्यक्ष आहेत. या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी १ जानेवारी ते १६ जानेवारीपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील १४२० गावांचा दौरा करुन शासनाच्या व अधिकार्‍यांच्या पाणीपुरवठा योजनेत झालेला भ्रष्टाचार उघड केला आहे.

दरम्यायान यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून एका-एका गावात चार-चार नळयोजना होऊनही गावाला प्यायला पाणी नाही ही वस्तुस्थिती असताना बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे आपण हे आंदोलन करत असल्याचं सुबोध सावजी यांनी म्हटलं आहे. बोरी गावच्या नळयोजनेच्या चार विहिरी होऊन पाणीपुरवठ्यावरही जवळपास १ कोटीच्यावर खर्च झालेला आहे. तरीही गावाला पाणी नाही. एवढेच नाही तर या नळयोजनांची विहिरीचे दानपत्र नाही व विहिर आजही शेतकर्‍याच्या ताब्यात आहे. त्यामुळे या विहिरीत बसून त्यांनी हे आंदोलन सुरु केले असून नळ योजनेच्या विहिरीत जोपर्यंत भ्रष्टाचार करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई केली जात नाही. तोपर्यंत विहिरीत बसून ठिय्या आंदोलनही करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

COMMENTS