उत्तर प्रदेशात भाजपच्या अडचणीत वाढ, सपा, बसपा एकत्र !

उत्तर प्रदेशात भाजपच्या अडचणीत वाढ, सपा, बसपा एकत्र !

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशात भाजपच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत असून भाजपाविरोधात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत.आज लखनौत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.  या आघाडीत सपा- बसपाने काँग्रेसला स्थान दिलेलं नसून रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात उमेदवार उभा करणार नसल्याचं मायावतींनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेसच्या काळात देशात घोषित आणीबाणी होती, तर आता देशात अघोषित आणीबाणी असल्याची टीका मायावतींनी केली आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसकडे अनेक वर्षे सत्ता होती ,काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार झाला, गरिबी वाढली, असा आरोप त्यांनी केला. यापुढे काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, आम्ही काँग्रेससोबत गेल्याने नेहमी त्यांचा फायदा झाला, पण आम्हाला यातून काहीच मिळाले नाही असंही मायावतींनी म्हटलं आहे.

तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मायावतींना पाठिंबा देत भाजपवर टीका केली आहे. ज्या दिवशी भाजपा नेत्याने मायावतींवर आक्षेपार्ह टीका केली होती, त्याच दिवशी महाआघाडीची पायाभरणी झाली होती. मायावतींचा अपमान हा माझा अपमान असल्याचे यादव यांनी म्हटलं आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा असून बसपा ३८ आणि सपा ३८ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचंही यादव यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS