सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारलं, विधानपरिषदेच्या निकालाचा अर्थ !

सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारलं, विधानपरिषदेच्या निकालाचा अर्थ !

मुंबई – विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल लागला आहे. या चार जागांपैकी भाजपनं कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा कशीबशी मिळवली. खरंतर सुशिक्षित मतदार हा भाजपचा पाठिराखा असल्याचं म्हटलं जातं. मात्र या निवडणुकीत तरी तो चुकीचा ठरला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ हा तसा भाजपचा बालेकिल्ला मात्र गेल्यावेळी निरंजन डावखरे यांनी त्याला सुरूंग लावला. आघाडीची असलेली सत्ता आणि दिवंगत वसंत डावखरे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले संबंध यामुळे निरंजन यांनी गेल्यावेळी विजय मिळवला होता. गेल्या 6 वर्षात त्यांनी मतदारसंघात चांगला जम बसवला होता. त्यातच भाजपनेही सत्ता मिळवल्यानंतर या मतदारसंघात चांगली बांधणी केली होती. तसंच डावखरे आणि भाजप यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली होती. त्याचा फायदा निरंजन डावखरे यांना झाला.

दुसरीकडे पहिल्यांदाच या मतदासंघातून निवडणूक लढवून शिवेसेनेनं चांगली लढत दिली. पक्षाचे उमेदवार संजय मोरे यांनी चांगली मते मिळवली. तर राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनीही चांगली मते मिळवली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला बाय बाय करत भाजपचा रस्ता धरला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांना कोणतीही नोंदणी करता आली नाही. असं असतानाही त्यांनी जोरदार लढत दिली. मात्र केवळ महिनाभरापूर्वी कमी मतदान असतानाही मोठ्या फरकाने जिंकणारे पुत्र अनिकेत तटकरे यांना विजय मिळवून देणारे सुनील तटकरे यांना पक्षाच्या दुस-या उमेदवाराला मात्र विजय मिळवून देता आला नाही हेही खरं आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघातही भाजपला सुशिक्षीत मतदारांनी नाकारलं असंच म्हणावं लागेल. गेल्यावेळी भाजपने पाठिंबा दिलेले अपूर्व हिरे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. यावेळी मात्र हिरे यांनी राष्ट्रवादीची कास धरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपला उमेदवार आयात करावा लागला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय नवल पाटील यांचे चिरंजीव अनिकेत पाटील यांना पक्षाने गळाला लावून त्यांना रिंगणात उतरवले होते. मात्र त्याचा काहीच फायदा पक्षाला झाला नाही. उत्तर महाराष्ट्रातील मंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जोर लावूनही त्यांचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. एवढच नाही तर भाजपा उमेदवार थेट तिस-या क्रमांकावर फेकला गेला.

विधानपरिषदेच्या मुंबईतील दोन्ही जागांवर भाजपला धक्का बसला असून या दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील सलग तिसऱ्यादा विजयी झाले आहेत. यावेळी मतदान झालेल्या 8000 पेक्षा जास्त मतांपैकी 4 हजार पेक्षा जास्त मते कपिल पाटील यांना मिळाली आहेत. तसेच मुंबई पदवीधर मतदारसंघातुन शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे शिवसेनेनं पुन्हा एकदा मुंबई पदवीधरचा गड राखला आहे.  विलास पोतनीस यांना 19,403 मते मिळाली आहेत. तर भाजपचे अमितकुमार मेहता  यांना 7792 मते मिळाली आहेत.

ज्या मुंबईमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा एक जागा जास्त जिंकली. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकल्या. त्याच मुंबईत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार तिस-या क्रमांकावर फेकला गेला. तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपचा उमेदवार मोठ्या फरकाने हरला आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी म्हणजेच सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारलं असंचं म्हणावं लागेल.

 

COMMENTS