त्यामुळेच शरद पवारांकडे निवडणूक लढवण्याचा आग्रह – मोहिते पाटील

त्यामुळेच शरद पवारांकडे निवडणूक लढवण्याचा आग्रह – मोहिते पाटील

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार असल्याची चर्चा कालपासून सुरु आहे. या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी आहे.

त्यामुळे आम्ही सर्वांनी मागणी केली की पवारांनी माढातून उभं रहावं. त्यावर पवार यांनी मी विचार करतो असं म्हटलं आहे. पण विचार करण्याची गरज नाही, तसेच निर्णय झालेला आहे, पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतलाय तो मान्य करावा लागेल असंही मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान याबाबत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी शरद पवार यांनी दिल्लीत मानाने गेलं पाहिजे. त्यामुळे शरद पवार यांनी माढामधून निवडणूक लढवावी अशी शेकाप पक्षाची आग्रहाची मागणी असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यापूर्वी तुम्ही पवारांना निवडून दिलं होतं, आता त्यापेक्षा दुप्पट मतांनी निवडून द्या असं आवाहनही जयंत पाटील यांनी मतदारांन केलं आहे.

COMMENTS