पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त  – विखे पाटील

पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त – विखे पाटील

मुंबई – मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.  मराठा आंदोलनासंदर्भात बोलताना विखे पाटील यांनी आज सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधीही जात विचारून बंदोबस्त लावण्याचा अवमानजनक प्रकार घडला नव्हता. पण मागील ६० वर्षात घडले नाही, ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने ४ वर्षात करून दाखवले आहे. माझ्याकडे विश्वसनीय माहिती आहे की, राज्य सरकारने मराठा आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या जाती विचारल्या आणि मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांना शक्यतोवर बंदोबस्तापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जातीच्या आधारे अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपरायणतेवर, प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह लावणारा हा प्रकार अत्यंत अश्लाघ्य आहे. मागील ४ वर्षात धर्माच्या आधारे देशभक्ती तपासली जात होती. आता जातीच्या आधारे कर्तव्यपरायणता तपासली जाते आहे. या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून, थोडी जरी चाड शिल्लक असेल तर जातीच्या आधारे अधिकाऱ्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या या प्रकाराबद्दल सरकारने तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.

COMMENTS