गेले 16 दिवस वेतनवाडीच्या मागणीसाठी राज्यातील लाखो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यावेळी मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. मी नेतृत्व करायला नाही तर नेतृत्वाला ताकद द्यायला आलो आहे. माता भगिनींची झोप उडवून तुम्ही तुमची स्वप्ने साकारायला दौरे करता. वेडा झालेला विकास राज्यातील जनतेला आणि देशाला परवडेल का? असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. तसेच ज्या मातांचे आशिर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे सरकारला शाप लागल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
अंगणवाडी कर्मचायांच्या सभेत उद्धव ठाकरे पोहचताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी केली. अंगणवाडी सारख्या सेवाभावी कर्मचाऱ्यांची सरकार गय करत नसेल तर इतरांचे काय, असा सवालही त्यांनी सरकारला केला. आमची मने अजून जिवंत आहेत, मुर्दाड मनाने आम्ही कारभार करु शकत नाही, माझे मंत्री देखील लोकाभिमुख कामात लक्ष घालत आहेत असेही त्यांनी सांगितले. लोकशाहीच्या मार्गाने ठोकशाही चालली असेल तर ती आम्ही मोडून काढू. तुमची ताकत सरकारला नमवू शकते, इतिहासाची पुनरावृत्ती घडवायची इच्छा त्यांची असेल तर ती पुनरावृत्ती घडवायची तयारी माझी आहे. सरकारला जाताना लाडू द्यायचे की चिक्की द्यायचे हे तुम्ही ठरवा असे म्हणत त्यांनी महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना टोला हाणला.
COMMENTS